केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याविषयी आदर व्यक्त करणारे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीविषयी वेळोवेळी तक्रारीचा सूर काढणारे पिंपरीतील नेते आझम पानसरे यांनी राष्ट्रवादीला ‘अलविदा’ केला असून काँग्रेसची वाट धरली आहे. मावळ लोकसभेसाठी पानसरे यांचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाची गंभीरपणे चर्चा होत असताना पानसरेंनी राष्ट्रवादीला ‘धक्का’ देण्याची खेळी केली आहे. ते काँग्रेसमध्ये गेले तरी पानसरेंचा ‘बाण’ शिवसेनेच्या धनुष्याला राहील, असेच चित्र आहे.
पानसरे व जगताप यांच्यात अनेक वर्षांपासून तीव्र वाद आहेत. २००९ मध्ये मावळमधून पानसरेंचा पराभव झाला, तेव्हा जगतापांनी विरोधात काम केल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. अजितदादा व जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यावरही संशयाची सुई होती. पराभवानंतर नाराज असलेल्या पानसरेंना राष्ट्रवादीच्या कोटय़ातील ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्षपद देऊन गोंजारण्यात आले. मात्र, त्यांच्या दृष्टीने ते उपयोगाचे नव्हते. पालिकेच्या राजकारणातून अंग काढून घेतल्यानंतर ते राष्ट्रवादीपासून चार हात लांब होते. पानसरे समर्थकांची तिकिटे कापणे, पदे देताना समर्थकांना डावलण्यात आल्याने अस्वस्थ असलेले पानसरे लोकसभेसाठी जगतापांना उमेदवारी मिळत असल्याचे पाहून पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आले. तसा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, योग्य ‘टायमिंग’च्या शोधात ते होते. त्यानुसार, ती वेळ त्यांनी साधली. दरम्यान, गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तळवडय़ात आले होते. त्याच दिवशी, सायंकाळी अजितदादा भोसरीत होते. पानसरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, अजितदादांच्या कार्यक्रमाकडे ते फिरकले नाहीत. काँग्रेस प्रवेशासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, तेव्हा पेढा भरवून मुख्यमंत्र्यांनी पानसरेंचे काँग्रेसमध्ये स्वागत केले होते. मात्र, पानसरेंनी घूमजाव केले. तेव्हा जगदीश शेट्टी, आबा ताकवणे, घनश्याम शेलारांनी त्यांना रोखून धरले होते. या वेळी मात्र पानसरेंनी थेट पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस प्रवेशाची घोषणा केली व राष्ट्रवादीला धडा शिकवण्याचे मनसुबे स्पष्ट केले.
राष्ट्रवादीत बंडखोरांना मानाचे स्थान
मावळचा उमेदवार असताना काँग्रेसने मनापासून काम केले. मात्र, राष्ट्रवादीने पाडले. कोण विरोधात गेले, जगजाहीर आहे. विरोधात काम करतात, बंडखोरी करतात, त्यांनाच मानाचे स्थान दिले जाते. बंडखोरांवर कारवाई न होता बक्षिसी दिली जाते. चिंचवड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. मात्र, राष्ट्रवादीने बंडखोरी घडवून आणली व गद्दारीने काँग्रेसचा पराभव केला, असा आरोप आझम पानसरेंनी या वेळी केला.