विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. राजकारणात यश-अपयश चालतेच, मात्र प्रचंड कामे करूनही अपयश आल्याने वाईट वाटल्याचे सांगत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत रविवारी पिंपरीत बोलताना दिले. नागपूरला होणाऱ्या अधिवेशनापूर्वी अलिबागला राष्ट्रवादीचे दोन दिवसाचे चिंतन शिबिर होणार असून त्यात या बदलांवर शिक्कामोर्तब होईल.
पवार म्हणाले,की पक्षविरोधी काम, ऐनवेळी हक्काचे उमेदवार दुसरीकडे जाणे, विरोधकांकडून राष्ट्रवादीची झालेली बदनामी अशा अनेक कारणामुळे राष्ट्रवादीला अपयश आले. या सर्व गोष्टींचा विचार चिंतन शिबिरात होईल. त्यानंतर, शहरी व ग्रामीण भागातील संघटनात्मक पातळीवर फेरबदल करण्याचा विचार असून शिबिरात त्यावर शिक्कामोर्तब होईल. राष्ट्रवादीची पुढील राजकारणाची दिशा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात पक्षाची भूमिकाही शिबिरात ठरेल. मराठा आणि मुस्लीम समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. अधिवेशनात आरक्षणाच्या विषयावर सरकारला धारेवर धरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात पिंपरी-चिंचवड हे सर्वाधिक वेगाने विकसित झालेले शहर आहे. गेल्या १० वर्षांत इतकी विकासकामे करूनही मतदारापर्यंत पोहोचवण्यात कमी पडलो, त्याचा फटका निवडणुकीत बसला. बंडखोरी झाली, ती केवळ पिंपरीत झाली नाही तर राज्यात सर्वत्र आणि सर्वच पक्षात झाली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.