मावळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ अजित पवार यांनी शनिवारी भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली. पार्थ पवार हे पिंपळे गुरव येथे प्रचारासाठी पोहोचले असता त्यांनी लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली. योगायोगाने ही भेट झाल्याचे सांगितले जात असले तरी लक्ष्मण जगताप आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यातील अंतर्गत वाद पाहता या भेटीनंतर तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

भाजपा आमदार लक्ष्मण जगताप आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे अंतर्गत वाद सर्वश्रुत आहेत. बारणे यांना मावळ लोकसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार रिंगणात आहेत. शनिवारी पार्थ पवार हे प्रचार करत असताना पिंपळे गुरव येथे पोहोचले तेव्हा भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांची योगायोगाने भेट झाली. त्यांच्यात १५ मिनिट चर्चा झाल्याने पिंपरी- चिंचवडच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

आमदार लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्यात काही पटत नाही. याच आठवड्यात पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा शिवसेनेची बैठक पार पडली. त्यावेळी पालकमंत्री गिरीश बापट आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे या देखील बैठकीत उपस्थित होत्या. परंतु, भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी बैठकीला अनुपस्थिती दर्शवली. तसेच त्यांच्या समर्थकांनी देखील दांडी मारली. बैठकीत बारणे यांच्या विरोधात पत्रक वाटण्यात आल्याने खळबळ माजली होती. त्यामुळे पार्थ अजित पवार आणि लक्ष्मण जगताप यांच्यात काय चर्चा झाली, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे. श्रीरंग बारणेंविरोधात लक्ष्मण जगताप पार्थ पवारला मदत करणार का ?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.