महाराष्ट्रात आज सकाळपासून चर्चा होती ती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर ईडीनं टाकलेल्या छाप्यांची. मुंबई आणि नागपूर अशा दोन्ही ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात आले असून या ठिकाणी ईडीनं शोधसत्र सुरू केलं होतं. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आण विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या असून आता अनिल देशमुख ज्या पक्षाचे नेते आहेत, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या छापेमारीवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ” केंद्रीय यंत्रणांना आलेल्या नैराश्यातून ही कारवाई सुरू असून आम्हाला त्याची यत्किंचितही चिंता वाटत नाही”, शरद पवार म्हणाले आहेत. पुण्यामध्ये नुकत्याच उद्घाटन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये सुबोध मोहिते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. यावेळी ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ED आम्हाला काही नवीन नाही!

“ईडी वगैरे आम्हाला काही नवीन नाहीत. अनिल देशमुख काही पहिले नाहीत. अनेकदा सत्तेचा या पद्धतीने वापर करण्याचा पायंडा आत्ताच्या राज्यकर्त्यांनी दाखवला आहे. त्याची आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नाही. अनिल देशमुखांवर केंद्र सरकारच्या काही यंत्रणांनी याआधीही कारवाई केली होती. पण त्यातून त्यांना काय हाती लागलं हे मला माहिती नाही. माझ्यामते काहीही हाती लागलं नाही. त्या नैराश्यातूनच अजून कुठून त्रास देता येईल का? या विचारातून हा त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. त्याची चिंता करण्याचं आम्हाला काही कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

लोक देखील त्याची गांभीर्याने दखल घेत नाहीत

“जो विचार आपल्याला मान्य नाही तो विचार दडपण्याचा प्रयत्न या प्रकारच्या यंत्रणा वापरून केला जातो. हे काही नवीन नाही. अनेक राज्यांमध्ये देखील आणि महाराष्ट्रात देखील यापूर्वी आपण कधी हे पाहिलं नव्हतं. केंद्राची सत्ता यांच्या हातात आल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी पाहायला लागलो. मला वाटतं याचा काही परिणाम होणार नाही. लोक देखील त्याची गांभीर्याने नोंद घेत नाही”, असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.

 

काँग्रेसच्या भूमिकेचं स्वागतच!

दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांना काँग्रेसनं घेतलेल्या स्वबळाच्या भूमिकेविषयी विचारलं असता त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेचं स्वागतच केलं. “प्रत्येक राजकीय पक्षाला स्वत:ची संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल आमची काहीच तक्रार नाही. आपल्या कार्यकर्त्यांची उमेद वाढावी यासाठी आम्ही सगळेच बोलत असतो. त्यासाठी काँग्रेस असे काही प्रयत्न करत असेल, तर त्यांचं आम्ही स्वागत करतो, हा प्रयत्न त्यांनी अवश्य करावा”, असं शरद पवार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp chief sharad pawar on ed raid on anil deshmukh house in mumbai nagpur pmw
First published on: 25-06-2021 at 17:01 IST