शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या आयुष्यात राजकीय संघर्ष केला. आमच्यावर टीकाही केली. पण मैत्रीही जपली, असे कौतुकास्पद उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यात काढले. निमित्त होते व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या उदघाटनाचे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते. शरद पवार यांच्या हस्ते या कलादालनाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी केलेल्या भाषणात शरद पवार म्हणाले, बाळासाहेबांबद्दल बोलायचे म्हटले तर अनेक आठवणी ताज्या होतात. ते राजकीय विरोधक असले, तरी आमच्यामध्ये मैत्रीचा ओलावा होता. बाळासाहेबांनी आमच्यावर टीका केली, तरी मैत्रीचा ओलावा कायम जपला. सुप्रिया सुळे यांची राज्यसभेवर पहिल्यांदा बिनविरोध निवड होण्याचे सर्व श्रेय बाळासाहेबांनाच जाते. मोरारजी देसाईंचे सरकार पडल्यानंतर देशाला इंदिरा गांधींचे खंबीर नेतृत्त्व मिळावे म्हणून त्यावेळी शिवसेनेने एकही उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला होता. स्वतःच्या राजकीय पक्षावर या निर्णयाचा विपरित परिणाम होईल, हे माहिती असतानाही त्यांनी धाडसीपणे तो निर्णय घेतला. माझ्या आजपर्यंतच्या जवळपास ५० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये मी बाळासाहेबांसारखा नेता पाहिलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
बाळासाहेबांचा जन्म पुण्यात झाला आणि त्यांचे नाव असलेले कलादालनही पुण्यातच पहिल्यांदा सुरू झाले, यामुळे बाळासाहेबांनाही बरे वाटले असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. बाळासाहेबांच्या आयुष्यात गुपित काहीही नव्हते. एका व्यंगचित्रकाराने इतिहास घडवल्याचे हे जगातील एकमेव उदाहरण असले, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांच्यासह महापालिकेतील विविध नेते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कलादालनाबद्दल…
व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे कलादालनाची निर्मिती गरवारे बालभवनजवळ करण्यात आली असून, ही जागा दहा हजार चौरस फूट एवढी आहे. त्यातील सात हजार चौरस फुटांवर बांधकाम करण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे कलादालनात लावण्यात आली आहेत. याशिवाय एक हजार चौरस फुटांचे आणखी एक कलादालन नवोदित व्यंगचित्रकारांना त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरवण्यासाठी बांधण्यात आले आहे. दुसऱ्या मजल्यावर दृकश्राव्य माध्यमाची सुविधा उपलब्ध असलेली पंचाहत्तर आसनक्षमतेची गॅलरी बांधण्यात आली असून, उर्वरित एक हजार चौरस फुटांच्या कलादालनात पुणे शहराविषयीचे प्रदर्शन व प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. या वास्तूत एकूण चार कलादालने बांधण्यात आली आहेत. या चार कलादालनांमध्ये प्रदर्शने भरवली जातील.