राजकारणासोबत क्रीडा संघटनांवरही पकड असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आपलं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. मराठी मनोरंजन विश्वातील दोन आघाडीच्या वाहिन्यांनी नुकतीच एका कुस्ती लीगची घोषणा केली आहे. मात्र या लीगच्या आयोजनावरुन दोन्ही वाहिन्यांमध्ये वाद निर्माण झाले होते. या वादावर तोडगा काढण्यासाठी काल पुण्यामध्ये कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. कात्रजच्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात ही बैठक पार पडली. या बैठकीत कोणत्या वाहिनीची कुस्ती आधी घ्यायची, याचसोबत स्थळ-वेळ आणि तारखांची निश्चीती करण्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे. ही समिती यावरचा निर्णय घेणार असल्याचं कळतंय.या बैठकीला दोन्ही वाहिन्यांचे प्रतिनीधीही उपस्थित होते.

दोन्ही वाहिन्यांनी आयपीएलच्या आधारावर कुस्ती लीग स्पर्धेची घोषणा केली आहे. ज्यामध्ये ८ संघ सहभागी होणार आहेत. मात्र निर्माण झालेल्या वादांमुळे दोन्ही वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी राज्य कुस्तीगीर परिषदेकडे ही बाब नेली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी कालच्या बैठकीत एका समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. याच बैठकीत हिंदकेसरी कै. गणपतराव आंदळकर यांना श्रद्धांजली वाहण्याचा विषयही विषयपत्रिकेवर होता.

या विषयावर कार्यकारिणीशी बोलून निर्णय घेण्यात येईल, असे पवार यांनी दोन्ही वाहिन्यांना सांगितले होते. या विषयावर निर्णय घेण्यासाठी सात सदस्यांची समिती नेमण्यात येईल ही समिती जो निर्णय घेईल तो अंतीम असेल असे पवार यांनी या बैठकीत सांगितले. हा तोडगा मान्य करण्यात आला. ही समिती उद्या (बुधवार ता. 26) सायंकाळी पुन्हा एकत्र येऊन या विषयावर निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.