मोठे प्रभाग अन् भाजप-शिवसेनेच्या युतीची धास्ती

िपपरी-चिंचवडच्या राजकारणात आतापर्यंत काँग्रेसला हिशेबात न धरणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्वीचा सूर बदलला आहे. जातीयवादी पक्षांचा फायदा होऊ नये, यासाठी दोन्ही काँग्रेसने मतविभागणी टाळली पाहिजे व त्यासाठी समविचारी पक्षांनी वेळप्रसंगी एकत्र येण्याची तयारी ठेवली पाहिजे, असा ‘विचार’ त्यांनी मांडला आहे. पडझडीतून सावरत निवडणुकीच्या दृष्टीने बांधणी करणाऱ्या काँग्रेसच्या दृष्टीने ही बाब उत्साहवर्धक असली, तरी स्वबळावर लढू, अशी काँग्रेस नेत्यांचीही भाषा आहे.

आगामी निवडणुकीसाठी पक्षाची व्यूहरचना करण्यासाठी अजितदादांच्या उपस्थितीत आकुर्डीत गुरुवारी प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक झाली. या वेळी बोलताना अजितदादांनी, कधी नव्हे ते शहरात काँग्रेस तसेच समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची भाषा केली. स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. जेव्हा निवडणुका लागतील, तेव्हा पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील. जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा कल लक्षात घेतला जाईल. जातीयवादी पक्षांना फायदा होणार नाही, याची खबरदारी घेत मतविभागणी टाळण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे आग्रही मत अजितदादांनी बैठकीत मांडले.

आजपर्यंत अजितदादा काँग्रेसला फारसे महत्त्व देत नव्हते. २०१२ च्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसचे पानिपत केले होते. काँग्रेसचे अनेक उमेदवार जे नगरसेवक होऊ शकत होते, ते त्यांनी राष्ट्रवादीत आणले. काँग्रेसचे प्रमुख नेते तर त्यांच्याच तालावर नाचतात, हे उघड गुपित आहे. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. चार सदस्यीय प्रभाग होणार असल्याने राष्ट्रवादीत चिंतेचे वातावरण आहे. भाजप-शिवसेनेत युती झाल्यास राष्ट्रवादीला अवघडच जाणार आहे. त्यामुळे भाजप-सेनेची युती होणार असल्यास दोन्ही काँग्रेसची आघाडी व्हावी, या दृष्टीने अजितदादांनी पहिले पाऊल टाकल्याचे मानले जात आहे. ऐन निवडणुकीच्या मोसमात त्यांची हीच भूमिका कायम राहील, याची शाश्वती देता येणार नाही, अशी शक्यता असल्याने काँग्रेस वर्तुळातून सावध प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.