पिंपरी महापालिकेत स्थायी समितीत वर्णी लागावी म्हणून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल ४६ नगरसेवकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तथापि, शहरातील चार प्रभाग अध्यक्षपदासाठी फारसे कोणी इच्छुक नसल्याने नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
पालिकेच्या अ, ब, क आणि ड प्रभाग अध्यक्षपदासाठी ५ एप्रिलला निवडणूक होणार आहे, त्यासाठी राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज मागविले आहेत. अ प्रभागासाठी जावेद शेख, वनिता थोरात यांचा, ब प्रभागासाठी मंदाकिनी ठाकरे, यमुनाबाई पवार, छाया साबळे यांचा, क प्रभागासाठी सुनीता गवळी, सुरेखा गव्हाणे आणि ड प्रभागासाठी वैशाली जवळकर, सोनाली जम यांचा अर्ज आल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी साडेतीन दरम्यान पालिका मुख्यालयात एकापाठोपाठ एक याप्रमाणे प्रभाग अध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहेत. चारही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येणार आहेत.
महापालिकेत विविध पदांच्या बाबतीत नगरसेवकांचा वेगवेगळा दृष्टिकोन दिसून येतो. महापौर व स्थायी समिती अध्यक्षपदावर सर्वाधिक सदस्यांचा डोळा असतो. महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला गटाचे आरक्षण असून आमदार विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे महापौरपदावर आहेत. अडीच वर्षांचे आरक्षण असले तरी सव्वा वर्षांचे दोन महापौर करण्याची राष्ट्रवादीची परंपरा आहे. मात्र, मंगला कदम, योगेश बहल यांनी तो नियम मोडून अडीच वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. त्यामुळे लांडे यांच्याकडून त्याचीच पुनरावृत्ती होणार असल्याचे दिसते. तगडा ‘गॉडफादर’ असल्याशिवाय स्थायी समिती अध्यक्षपद पदरात पडणार नाही, हे स्पष्ट असल्याने किमान सदस्यपदावर तरी वर्णी लागावी, अशी भावना नगरसेवकांमध्ये असते. नुकत्याच झालेल्या निवडीवेळी राष्ट्रवादीच्या ४६ नगरसेवकांनी स्थायी समितीचीच मागणी केली होती. मात्र, नेत्यांनी कोटा पध्दत वापरून आपापले समर्थक बसवले.नको असलेले पद म्हणून पाहिल्या जाणाऱ्या प्रभाग अध्यक्षपदासाठी फारसे कोणी इच्छुक नाही. मात्र, इतर कोणते पद मिळत नसल्यास प्रभाग अध्यक्षपदावर समाधान मानून ते स्वीकारण्याची तयारी काही जणांनी ठेवली असल्याचे दिसते.