राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त रविवारी (२० डिसेंबर) पुण्यात होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी पक्षाच्या िपपरी-चिंचवड शहरातील नगरसेवकांना प्रत्येकी एक हजाराचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. िपपरीतून साधारणपणे लाखभराची उपस्थिती मिळावी, यादृष्टीने शहर राष्ट्रवादीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आकुर्डीत बैठक तयारीचा आढावा घेतला.
पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील रेसकोर्स येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करून ‘राष्ट्रवादीमय’ वातावरण करण्याचा पक्षाचा मानस आहे. त्यासाठी प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आली आहे. महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक यासह विविध क्षेत्रातील व अराजकीय नागरिकांना सहभागी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नगरसेवकाने कमीत कमी ५०० व जास्तीत जास्त हजार माणसे आणावीत, त्यासाठी होणारा खर्च संबंधिताने स्वत:च करावा, असे अपेक्षित धरण्यात आले आहे. यासंदर्भात, शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पातळीवर बैठकांचा सपाटा सुरू आहे. माजी मंत्री शशिकांत िशदे, युवक प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या उपस्थितीत नियोजनाची बैठक नुकतीच झाली. शुक्रवारी अजितदादांनी आकुर्डी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि तयारीचा आढावा घेतला. रविवारी होणाऱ्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. शहर राष्ट्रवादीच्या वतीने शरद पवार यांना चांदीचा अमृतकलश आणि संत तुकोबांची पगडी भेट स्वरूपात देण्यात येणार आहे.