23 July 2018

News Flash

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीला खिंडार; अजित पवारांना धक्का

शक्य तितक्या नगरसेवकांना भाजपमध्ये जाण्यापासून थोपवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू होते.

सर्वपक्षीय १० नगरसेवक व १० माजी नगरसेवकांचा भाजपप्रवेश;

आमदार महेश लांडगे यांची पोस्टरबाजी; पिंपरीत राजकीय उलथापालथ सुरू

‘लक्ष्य २०१७’ डोळ्यासमोर ठेवून पिंपरीतील राजकारण तापू लागले असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रभावक्षेत्रात सोमवारी (२८ नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथमच राजकीय कार्यक्रमासाठी येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना व अपक्ष असे मिळून १० नगरसेवक व काही माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांपुढे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी लांडगे यांनी केली असून त्यांच्या समर्थकांनी शहरभरात पोस्टरबाजी केली आहे.

भोसरी मतदारसंघाच्या सर्वागीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आमदार लांडगेंनी ‘व्हिजन २०२०’ अभियान तयार केले आहे, त्याचे सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. भोसरीत लांडगे नाटय़गृहाशेजारच्या मैदानात सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे, खासदार अमर साबळे, अनिल शिरोळे, आमदार लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे आदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या राजकीय मेळाव्यात भाजप प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडण्यास यानिमित्ताने प्रारंभ होणार आहे. अन्य पक्षातील ताकदीचे नेते व कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल होत आहेत. शक्य तितक्या नगरसेवकांना भाजपमध्ये जाण्यापासून थोपवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू होते. आतापर्यंत १० नगरसेवक व १० माजी नगरसेवक, दोन स्वीकृत प्रभाग सदस्य तसेच अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

प्रवेश करणारे आजी-माजी नगरसेवक

शांताराम भालेकर, नितीन काळजे, नितीन लांडगे, श्रद्धा लांडे, शुभांगी लोंढे (राष्ट्रवादी), सुरेश म्हेत्रे, अरूणा भालेकर (राष्ट्रवादीशी सलग्न अपक्ष नगरसेवक), राहुल जाधव, मंगेश खांडेकर (मनसे), अजय सायकर (शिवसेना) यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. तथापि, राष्ट्रवादीचे नगरसेवक वसंत लोंढे, तसेच काँग्रेसचे नगरसेवक जालींदर शिंदे यांचा उशिरापर्यंत ठोस निर्णय झाला नव्हता. याशिवाय, माजी उपमहापौर सुदाम लांडगे, माजी नगरसेवक बबन बोराटे, संतोष लोंढे, रामदास कुंभार, अंकुश पठारे, अलका यादव, सुलोचना भोवरे, सारिका लांडगे, सुनंदा फुगे हे देखील भाजपमध्ये दाखल होत आहेत. मनसेचे माजी शहरप्रमुख मनोज साळुंके, अमृत सोनवणे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दत्तात्रय गायकवाड यांचे पुतणे संजय गायकवाड, भोसरी विधानसभेचे माजी सेनाप्रमुख विजय फुगे तसेच संजय नेवाळे, योगेश लोंढे, शैलेश मोरे, नंदू दाभाडे आदींचा प्रवेश होणार आहे.

First Published on November 28, 2016 5:29 am

Web Title: ncp corporator to join bjp in present of chief minister