जुन्या हद्दीचा विकास आराखडा आणि टेकडय़ांवरील जैववैविध्य उद्यानाचे (बायोडायव्हर्सिटी पार्क- बीडीपी) आरक्षण या मुद्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत मोठे वादंग होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.
समाविष्ट गावांच्या टेकडय़ांवर बीडीपीचे आरक्षण नको, अशी उघड भूमिका राष्ट्रवादीतील पंचेचाळीस नगरसेवक आणि तीन आमदारांनी घेतली असून शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांनी मात्र टेकडय़ांवर बीडीपीचेच आरक्षण असले पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली आहे. तेवीस गावांप्रमाणेच जुन्या हद्दीच्या टेकडय़ांवरही बीडीपीचे आरक्षण असले पाहिजे, अशीही भूमिका खासदार चव्हाण यांनी जाहीर केली आहे. मात्र, या बीडीपी आरक्षणाला खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र विरोध करत हे आरक्षण टेकडय़ांवर दर्शवू नका, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्यामुळे पक्षातील वाद वाढले आहेत. बीडीपीग्रस्त शिष्टमंडळासोबत खासदार सुळे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
बीडीपीमुळे निर्माण झालेल्या या वादाच्या पाश्र्वभूमीवर पक्षाची बैठक मंगळवारी होत असून सर्व आमदार, नगरसेवक, महापालिका पदाधिकारी तसेच अन्य पदाधिकारी बैठकीस उपस्थित राहणार आहेत. बीडीपीच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या नगरसेवकांचे म्हणणे या वेळी अजित पवार ऐकून घेणार असल्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व आले आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या पक्षाच्या बैठकीतही अनेक नगरसेवकांनी शहराध्यक्षांनी घेतलेल्या भूमिकेला थेट आव्हान देत, कोणाशीही चर्चा न करता शहराध्यक्ष पक्षाची भूमिका कशी जाहीर करतात, असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला होता. तसेच बीडीपी क्षेत्रातील एक इंचही जमीन देणार नाही, असाही इशारा समाविष्ट गावातील नगरसेवकांनी या बैठकीत दिला होता.
महापौर बंगला येथे सायंकाळी सहा वाजता ही बैठक होणार असून पवार यांच्याबरोबरच खासदार सुळे यांचीही उपस्थिती या वेळी असेल. त्यामुळे बैठकीत नव्या व जुन्या हद्दीच्या आराखडय़ातील बीडीपी हाच मुद्दा बैठकीत मुख्यत: चर्चेत येणार हे स्पष्ट आहे.