लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची दाणादाण उडाली, त्यास अनेक घटक कारणीभूत ठरले. मात्र, कामगार क्षेत्रातील तीव्र नाराजीचा जबर फटका बसल्याची बाब राष्ट्रवादीशी सलग्न राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
कामगार क्षेत्रात पक्षाविषयी असलेली तीव्र नाराजी भोसले यांनी एका निवेदनाद्वारे पवारांपुढे मांडली आहे. संघटना उभारल्यास कामगारांना देशोधडीला लावले जाते. गुंड व पोलिसांना हाताशी धरून आंदोलने चिरडली जातात. शिवसेना व मनसेने संघटना केल्यास त्यांच्या दहशतीमुळे कंपन्या तातडीने करार करतात. त्यांचे नेते कामगार नेत्यांच्या पाठीशी उभे राहतात. याउलट, आपले नेते संघटनाच करू नका, असा सल्ला देतात. औद्योगिक न्यायालये, कामगार कार्यालयात न्याय मिळत नाही. पक्षाचा आधार घेऊन अनेक ठेकेदार गब्बर झाले. आपण उद्योगपतींना सांभाळले, व्यापाऱ्यांना सोयीसुविधा दिल्या. मात्र, त्यांनी मोदींचा जप केला. सामान्यांचा राग पक्षावर नाही. मात्र, पक्षाचा आधार जे ठेकेदार, बिल्डर, व्यापारी मोठे झाले. त्यांनी सामान्य जनतेला हीन वागणूक दिली. त्यांनाच पक्षात महत्त्वाचे स्थान मिळत असल्याने लोकांनी मताद्वारे राग काढला. अशा परिस्थितीत कंत्राटी कामगार कायदा रद्द करणे, शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासारखे उपाय केल्यास पूर्वीचा हक्काचा मतदार आपल्याकडे पुन्हा येईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे. कामगारमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री म्हणून अजित पवार नेहमीच उपलब्ध आहेत. मात्र, तरीही कामगारांचे प्रश्न सुटत नाही, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.