पाच वर्षांपूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांनी माझ्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली नसती, तर कदाचित हा भाऊ तुम्हाला लक्षात पण आला नसता, दिसलाही नसता. माझ्यातील जे कर्तृत्व आहे ते सुद्धा पहायला मिळालं नसतं असे भावनिक उद्गार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी काढले आहेत. २०१४ ला गद्दार, घरफोड्या, पाठीत खंजीर खुपसणारा, खलनायक असे म्हणायचे. मात्र जसंजसं काम होत गेलं तसं धनंजयचा धनुभाऊ झाल्याचे त्यांनी सांगितलं. रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये आभार मेळाव्यात बोलत होते.

“आज मी जे काही आहे ते शरद पवार आणि अजित पवारांमुळे आहे. पाच वर्षात काम केली, नाही तर २०१४ ला मला गद्दार, घरफोड्या, पाठीत खंजीर खुपसणारा, धन्या, खलनायक असं म्हणायचे. मात्र, जसंजसं काम होत गेलं तस धन्याचा धनंजय झाला. धनंजयचा धनुभाऊ झाला आणि आता…..असं म्हणताच शिट्या सुरू झाल्या…शेवटी काही जरी झालं तरी नियती इमानदारीच्या पाठीमागे असते. सात वर्षात खूप काही सहन केलं पण कधी दुःख व्यक्त केलं नाही. नाराजी व्यक्त केली नाही. समाजसेवेचा वसा जो हाती घेतला आहे तो स्वर्गीय मुंडे साहेबांमुळे, अण्णांमुळे…तो कधीच सोडला नाही,” असंही धनंजय मुंडे म्हणाले.

विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी स्विकारल्यानंतर सोशल मीडियावर दीडशे शिव्या
काही अनुभव तर असे आहेत की, विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी स्विकारल्यानंतर मला सोशल मीडियावर दिवसभरात दीडशे शिव्या देणारा त्याचं काम होत नाही म्हणून याला ना त्याला पुढे करून आणत आहे. मला ही कळत आहे. मी मनात राग ठेवत नाही, मी त्याचंही काम करतो. यालाच मनाचे मोठेपणा म्हणतात असं धनंजय मुंडेंनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा – जेव्हा चाहत्यांच्या प्रेमामुळेच धनंजय मुंडे वैतागतात…

“२०१४ च्या काळात धनंजय मुंडे तुमच्या समोर आला. लोकांना जसं दाखवलं, माध्यमांनी तुमच्यासमोर मांडलं तस तुमचं मत झालं. मला तुम्हाला दोष देता येणार नाही. ते माझं प्रारब्ध होतं, ते मी भोगलं. शेवटी नियतीने सांगितलं आहे, कर्तृत्वाने आणि कष्टाने कमावल्यालचं कायम राहतं. अलगत मिळालेलं कधीच राहत नाही,” असा टोला भगिनी पंकजा मुंडे यांना लगावला.