विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी काम केले नाही. आपल्याच पक्षातील अनेक जण पराभवाला कारणीभूत ठरले. राज्यातील आपल्या सरकारवर मतदार नाराज होते. त्यामुळे मतदारांनी आपल्याला नाकारले. पराभवाची अशी कारणे राष्ट्रवादीच्या पुण्यातील उमेदवारांनी शनिवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना दिली.
विधानसभा निवडणूक लढवलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बैठक शनिवारी मुंबईत बोलावण्यात आली होती. बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते. उमेदवारांबरोबर यावेळी विभागनिहाय चर्चा करण्यात आली. पुणे शहर व जिल्ह्य़ातील अठरा उमेदवारांनी यावेळी त्यांचे मनोगत मांडताना पराभवाची कारणे सांगण्याचा प्रयत्न केला. वडगावशेरी मतदारसंघातील बापू पठारे यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांबाबत तसेच पदाधिकाऱ्यांबाबत पवार यांच्याकडे तक्रार केली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मतदारसंघात काम केले नाही. त्यामुळे पराभव झाल्याचे पठारे यांनी यावेळी सांगितले. कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवलेले बाबुराव चांदेरे यांनी पराभवाच्या कारणांबाबत फारसे काही सांगितले नाही. नेत्यांनी उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी सर्वाचे आभार मानले.
माहिती तंत्रज्ञानाच्या उद्योगांना पुण्यात आपण सवलती दिल्या. हे उद्योजक आणि त्यातील बहुतांश अभियंते हे परराज्यातून पुण्यात आलेले आहेत. त्यांनी येथे भाजपला मोठय़ा प्रमाणात मतदान केले, असे पर्वती मतदारसंघातून निवडणूक लढलेले महापालिकेतील सभागृहनेता सुभाष जगताप यांनी सांगितले. व्यापारीवर्ग, उच्च मध्यम वर्ग राष्ट्रवादीवर नाराज होता, असेही ते म्हणाले. कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार भगवान वैराट यांनी आघाडी सरकारच्या काळात झालेल्या जातीय हत्यांबद्दलचा विषय बैठकीत मांडला. अशा प्रकारांमुळे विविध समाज विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मागे राहिले नाहीत, असे ते म्हणाले. शिवाजीनगर मतदारसंघातील उमेदवार आमदार अनिल भोसले यांनी पक्षाच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत काम केल्याचे सांगून पक्षाने यापुढे काय केले पाहिजे याबाबत मत मांडले. शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या अनेक विषयांबाबत पक्षाने वेळेत निर्णय घेतले नाहीत. बांधकामे, एलबीटी तसेच तेवीस गावांमधील बीडीपी यासंबंधी निर्णय घ्यायला हवे होते. म्हाडाच्या नियमावलीबाबत सातवेळा आपण लक्षवेधी मांडली. तरीही निर्णय झाला नाही, असे  खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवलेले दिलीप बराटे म्हणाले.