महापालिकेतील पंधरा प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला या वेळी सर्वाधिक आठ अध्यक्षपदे मिळाली. मनसेला तीन, भाजपला दोन आणि काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी एका प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळाले आहे. ही निवडणूक काँग्रेस आघाडी विरुद्ध महायुती अशी झाली.
प्रभाग समिती अध्यक्षपदांसाठी गेल्या आठवडय़ात गुरुवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्या प्रक्रियेतच सहा अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली होती. त्यात राष्ट्रवादीच्या तीन, भाजपच्या दोन आणि काँग्रेसच्या एका उमेदवाराचा समावेश होता. उर्वरित नऊ समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी सोमवारी महापालिका सभागृहात निवडणूक झाली. टिळक रस्ता प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसेच्या प्रिया गदादे यांच्या मतदानाबाबत या वेळी प्रश्न उपस्थित झाला. त्यांची निवड न्यायालयाने रद्द केलेली असल्यामुळे त्यांच्या मतदानाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, त्यांना या निर्णयावर उच्च न्यायालयात जाण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत मुदत असल्यामुळे त्यांच्याकडून शपथपत्र घेण्यात आले व त्यानंतर त्यांनी मतदान केले. या निवडणुकीत मनसेचे राजाभाऊ लायगुडे सहा विरुद्ध चार मतांनी विजयी झाले.
प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे. नाव व कंसात प्रभाग समिती या क्रमाने.
राष्ट्रवादी काँग्रेस- सुनंदा देवकर (नगर रस्ता), सतीश म्हस्के (येरवडा), शिवलाल भोसले (धनकवडी), सुषमा निम्हण (औंध), हीना मोमीन (भवानी पेठ), प्रशांत जगताप (कोंढवा-वानवडी), उषा जगताप (सहकारनगर), प्रदीप गायकवाड (ढोले पाटील रस्ता).
महाराष्ट्र नवनिर्माण सेना- सुरेखा मकवान (वारजे-कर्वेनगर), राजाभाऊ लायगुडे (टिळक रस्ता), पुष्पा कनोजिया (कोथरूड).
भारतीय जनता पक्ष- धनंजय जाधव (विश्रामबागवाडा), मानसी देशपांडे (बिबवेवाडी).
काँग्रेस- विजया वाडकर (हडपसर).
शिवसेना- नीता मंजाळकर (घोले रस्ता).