ओबीसींचा चेहरा असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तुरुंगात आहेत. छगन भुजबळ यांच्यावरील कलम २४ रद्द केल्याने त्यांना लवकरच जामीन मिळेल आणि ते लवकरच तुरूंगातून बाहेर येतील, असे वक्तव्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केले. ते मंगळवारी पुण्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. दिलीप कांबळे यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, महात्मा फुले वाड्याच्या परिसरातच मी लहानाचा मोठा झालो असून त्यामुळे फुलेंच्या विचारांचा वारसा घेऊन राजकीय क्षेत्रात काम करत आहे. फुले जन्माला आले नसते तर अन्याय होतच राहिले असते, अशी भूमिका कांबळे यांनी यावेळी मांडली. केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांच्याकडे पाहत म्हणाले की, छगन भुजबळ यांच्यावर कलम २४ रद्द केल्याने भुजबळांना जामीन मिळेल आणि ते कायद्याची लढाई जिंकून लवकरच बाहेर असतील. छगन भुजबळ यांच्यासारखा लढवय्या नेता बाहेर असणे आवश्यक असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ विचारवंत डॉ. मा.गो. माळी यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम एक लाख, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक हेदेखील उपस्थित होते.