सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपा सत्तेवर आली. तोच सोशल मीडिया आता त्यांना सत्तेवरुन खाली खेचेल, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपाचा समाचार घेतला. पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. जनतेने यांना सत्ता दिली. पण सत्तेचे नियोजन करण्यात हे अयशस्वी ठरल्याचा टोला देखील त्यांना लगावला.

वशाटोत्सवाच्या माध्यमातून सोशल मिडियावर विविध सामाजिक विषयांतून राज्यभरात अनेक तरुण -तरुणी आपली मते व्यक्त करतात. अशा तरुणांनी एकत्र येत वशाटोत्सव सुरु केला. यंदा या कार्यक्रमाचे तिसरे वर्ष होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, रोहित पवार हे उपस्थित होते.

मुंडे म्हणाले की, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लढविली जाणार असून यामध्ये तरुणांचे योगदान महत्वाचे असणार आहे. तर राज्यात १५ वर्षांच्या नवसाने फसणवीस सरकार सत्तेवर आले (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फसवणीस म्हणून उल्लेख) पण ते त्यांच्याच मंत्र्याच्या मुक्याने ते सत्तेवरुन खाली येतील, असेही त्यांनी म्हटले.