पंढरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके हे पुण्यातील रुबी हॉल रुग्णालय येथे उपचार घेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रूग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके हे पुण्यातील रुबी हॉल रुग्णालय येथे उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली.
या भेटीनंतर शरद पवार यांना भारत भालके यांच्या प्रकृतीबाबत विचारले असता. ते म्हणाले की, त्यांच्या प्रकृती बाबत डॉक्टरांना विचारा असे त्यांनी सांगितले. याबाबत रुबी हॉल रूग्णालयाचे संचालक डॉ. परवेझ ग्रँट म्हणाले की, “आमदार भारत भालके यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. तसेच त्यांना पोस्ट कोविडमुळे खूप त्रास होत आहे. त्यावर उपचार सुरू असून त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली आहे. तर त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. आमची टीम लक्ष ठेऊन आहे” असंही त्यांनी सांगितले.
भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातबर नेत्यांपैकी एक आहेत. सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले आहेत. मात्र तिन्ही वेळा ते वेगळ्या पक्षातून सभागृहातून पोहचले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तर भारत भालके हे भाजपात जाणार होते. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीत दाखल झाले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजयही मिळवून विजयाची हॅटट्रिक केली. ऑक्टोबर महिन्यात भारत भालके यांना करोनाची लागण झाली आहे. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. मात्र गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती पुन्हा भारत भालके यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास आहे. कालपासून त्यांची तब्बेत खालावली आहे.
भारत भालके यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, जनतेच्या सेवेसाठी ते परत लवकर बरे होऊन यावेत यासाठी आमदार भालके यांचे धाकटे बंधू पंजाबराव भालके यांनी विठ्ठल रुक्मिणीला साकडे घातले. भारत भालके यांच्या प्रकृतीत आज दुपारी थोडीशी सुधारणा झाली होती. त्यांना दीर्घायुष्य लाभावे, लवकर या संकटातून बाहेर यावेत, असे साकडे त्यांचे लहान बंधू पंजाबराव भालके यांनी घातले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2020 5:42 pm