राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचं करोनामुळे निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. त्यांना दुसऱ्यांदा करोना झाल्याचं बोललं जात आहे. त्रास होत असल्यानं त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

आमदार भारत भालके यांना काही महिन्यांपूर्वी करोना झाला होता. त्यावर त्यांनी उपचाराच्या मदतीने यशस्वीपणे मातही केली होती. मात्र, त्यांना पोस्ट कोविडचा त्रास जाणवू लागला. त्रास होत असल्यानं त्यांना पुण्यातील रुबी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असताना भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काल (२७ नोव्हेंबर) दुपारी रुग्णालयामध्ये जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. रुबी हॉल रूग्णालय प्रशासनाकडून आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले असल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उपचार सुरू असतानाच भारत भालके यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर पंढरपुरातील सरकोली येथे शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

जनतेशी घट्ट नाळ

भारत भालके यांचा थेट जनतेशी संपर्क होता. स्वभावानं बेधडक असलेल्या भालके यांच्याशी कार्यकर्त्यांचाही थेट संपर्क असायचा. जनतेशी दांडगा संपर्क असल्यानंच सलग तीन वेळा ते विधानसभेत पोहोचले होते. २००४ मध्ये त्यांनी शिवसेनेकडून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. नंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि पंढरपूर – मंगळवेढा हा नवीन मतदारसंघ तयार झाला. याच मतदारसंघातून भालके यांनी २००९ मध्ये रिडालोसकडून निवडणूक लढवत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत ‘जायंट किलर’ अशी ओळख बनवली होती. २०१४ मध्ये पंढरपुरात प्रशांत परिचारक यांचा त्यांनी पराभव केला. २०१९च्या निवडणुकीत काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आणि जेष्ठ आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव करत आमदारकीची हॅट्ट्रिक केली होती.