News Flash

भाजप-राष्ट्रवादीचे ‘नातेगोते’

आमदार लांडगे व शहराध्यक्ष वाघेरे एकमेकांचे नातेवाईक आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना भाजप आमदार महेश लांडगे यांनी दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरला आहे.

सूचक टिपण्णीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा

भारतीय जनता पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना ज्या पद्धतीने वाढदिवसाच्या जाहीर शुभेच्छा दिल्या आहेत, त्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या ठरल्या आहेत. वाघेरे हे आमच्या दृष्टीने शेलारमामा असून त्यांची आम्हाला सदैव साथ असल्याची सूचक टिपणी शुभेच्छांमध्ये आहे.

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर नात्यागोत्याचा कायमच प्रभाव राहिला आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत वेळोवेळी पाहुण्यांचे राजकारण सातत्याने दिसून आले आहे. पक्ष वेगळा असला, तरी नात्यागोत्याला प्राधान्य दिल्याचे अनेक दाखले आहेत. पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठा शहरात महत्त्वाची मानली जात असून नात्यातील ज्येष्ठ नेता म्हणेल तेच करण्याची अघोषित परंपरा आहे.

आमदार लांडगे व शहराध्यक्ष वाघेरे एकमेकांचे नातेवाईक आहेत. दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत. राष्ट्रवादी व भाजपमध्ये सध्या संघर्ष सुरू असला, तरी त्यांनी नात्यागोत्याची परंपरा जपली आहे. वाघेरेंना शुभेच्छा देण्यासाठी लांडगे यांनी वृत्तपत्रात पानभर जाहिराती दिल्या आहेत, फलक लावले आहेत आणि समाजमाध्यमांवरही या शुभेच्छांचा वर्षांव आहे.

लांडगे परिवाराचे शहरभरात तसेच राजकीय वर्तुळात बरेच नातेवाईक आहेत. केवळ वाघेरे यांनाच शुभेच्छा देण्यामागे आमदार लांडगे यांचे नेमके काय धोरण आहे, याविषयी तर्कवितर्क आहेत. गेल्या काही वर्षांपासून वाघेरेंना आम्ही शुभेच्छा देत असून ते आमचे नातेवाईक आहेत. इतर कोणताही हेतू किंवा कारण त्यामागे नसल्याचे लांडगे परिवाराकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2017 1:25 am

Web Title: ncp pimpri president sanjog waghere wishes bjp mla mahesh lunde
Next Stories
1 कसबा पेठेतील कुरिअर कंपनीच्या कार्यालयावर दरोडा घालणारे अटकेत
2 गणेशोत्सवानिमित्त फुलबाजारात मोठी आवक
3 गणेशोत्सवात पीएमपीकडून वर्तुळाकार मार्ग
Just Now!
X