अजित पवार यांची स्पष्टोक्ती
आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग दोनचा असो की चार सदस्यांचा, राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवण्याच्या पूर्ण तयारीत आहे, असे सांगत निवडणुकीसाठी कोणाचेही तिकीट ‘फिक्स’ केलेले नाही आणि ‘कामाला लागा’ असे वैयक्तिकरीत्या कोणालाही सांगितलेले नाही, अशी स्पष्टोक्ती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीतील स्थानिक नेत्यांशी बोलताना केली आहे.
नेत्यांशी सलगी असल्याचे दाखवत आपले तिकीट निश्चित झाले आणि दादांनी ‘कामाला लागा’ असे सांगितले आहे, असे वातावरण पक्षात काही जणांकडून केले जाते. ही शक्यता लक्षात घेऊन आकुर्डीतील बैठकीत सर्वापुढे बोलताना अजितदादांनी स्पष्ट केले, की कोणाचेही काहीही निश्चित नाही. पक्ष म्हणून निवडणुकीच्या तयारीला लागा.
उमेदवारी ठरवताना सर्व स्थानिक नेत्यांशी चर्चा करून सर्व बाबींचा विचार करूनच उमेदवार ठरवले जातील. भाजपशी आपल्याला लढायचे आहे, असे स्पष्ट करत सत्तेच्या माध्यमातून शहरात केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची सूचना त्यांनी
केली.
केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्या ठिकाणी जनतेच्या विरोधात जाणारे अथवा चुकीचे निर्णय झाल्याचे दिसताच तातडीने आंदोलने झाली पाहिजेत. ‘अच्छे दिन’चे फसवे आश्वासन देऊन जनतेची कशाप्रकारे फसवणूक झाली, हे शक्य तिथे उघड करा, असे ते म्हणाले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आपल्या भाषणात बोलताना, पक्षातील गट-तट संपवा, अशी मागणी केली होती. त्याचा संदर्भ देत अजितदादांनी पक्षात गटतट आहेत, अशी कबुली देतानाच त्याचा फार बाऊ करण्याची गरज नाही. गट म्हणायचे नाही की तट म्हणायचे नाही. सगळे डोक्यातून काढून टाका, असे बैठकीत स्पष्ट केले.