पुणे : पुणे लोकसभेची जागा काँग्रेस सोडणार नाही, असे काँग्रेसच्या नेत्यांनी ठणकावून सांगितल्यानंतर लोकसभेच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने नरमाईची भूमिका घेतली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये यापूर्वी झालेल्या जागा वाटपाच्या सूत्रानुसार जागा वाटप व्हावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा आहे. त्यामुळे पुणे लोकसभेची जागा कोण लढविणार याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ पातळीवरील नेते घेतील आणि सामंजस्याने त्यावर तोडगा काढला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी येथे सांगितले.

पुणे लोकसभेच्या जागेवर दावा सांगितल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रसमध्ये दावे-प्रतीदावे सुरु झाले होते. या पाश्र्वभूमीवर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर पुणे लोकसभेच्या जागेचा निर्णय सामंजस्याने घेण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीच्या निमित्ताने समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, हे दिसून आले आहे, असे सांगून पवार म्हणाले, की पुण्यातील लोकसभेच्या जागेबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. सन २००९ आणि सन २०१४ रोजी आघाडीच्या सूत्रानुसार जागा वाटप व्हावे, अशी पक्षाची भूमिका आहे. यात लहान-मोठा असा भेदभाव नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित हल्लाबोल आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे लोकसभेची जागा लढविणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले होते. त्यांच्या या घोषणेचे तीव्र पडसाद काँग्रेसमध्ये उमटले होते.

पुणे लोकसभेची जागा कोणाची, यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून दावे-प्रतीदावे सुरु झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार असल्याचे पवार यांनी सांगितल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनीही काँग्रेसच ही जागा लढविणार असल्याचे ठणकावून सांगितले होते. मात्र आता या दोन्ही पक्षातील राजकीय संघर्ष कमी होण्याची शक्यता आहे.

अन्यथा भाजप विरोधी पक्षात बसेल

आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजप-सेनेच्या युतीची चर्चा होईल. शिवसेनेला अडीच वर्षांच्या कालावधीसाठी मुख्यमंत्री पद देण्याची भाषा भाजपकडून होईल आणि दोन्ही पक्ष एकत्र लढतील. तसे झाले नाही तर भाजप विरोधी बाकावर बसलेला दिसेल, असे पवार यांनी सांगितले. स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा शिवसेनेकडून करण्यता आली आहे. शिवसेनेबरोबर युती झाली नाही तर सत्ता गमवावी लागेल, याची जाणीव भाजप नेत्यांना आहे. त्यामुळेच युती करण्याबाबत त्यांचे नेते सकारात्मक आहेत. त्यासाठी अधिकच्या जागा देण्याची तयारीही भाजपकडून दाखविण्यात येईल. या परिस्थितीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आगीतून उठून फुफाटय़ात पडणार नाहीत, असे पवार यांनी स्पष्ट केले.