राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे धनगर समाजाचा घटनेच्या तिसऱ्या सूचीत समावेश करण्याच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही, तर त्यांचा पहिल्या सूचीतच दुसरा विभाग करून समावेश करावा. या समाजाला आदिवासींप्रमाणेच नोकरी, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आपल्या पक्षाची भूमिका असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले. धनगर समाजाला राष्ट्रवादीचा विरोध असल्याचा अपप्रचार काही मंडळींनी जाणीवपूर्वक तर, काहींनी अजाणतेपणातून सुरू केला आहे. तो त्यांनी थांबवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्दय़ावरून राज्यात सध्या राजकीय वादळ उभे राहिले आहे. त्याबाबत पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. धनगर समाजाची आरक्षणाची मागणी योग्य असून राष्ट्रवादीचा या मागणीला पाठिंबा आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही भूमिका आदिवासी कल्याणमंत्री मधुकर पिचड यांनी मांडल्यामुळे आमची भूमिका वेगळी असल्याचा समज झाला. त्यानंतर धनगर समाज एस.टी. आरक्षण कृती समितीचे प्रमुख हनुमंत सूळ यांनी माझ्या उपस्थितीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन दिले. त्यामध्ये आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे स्पष्ट झाले. राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार धनगर समाजाला तिसऱ्या सूचीत आरक्षण देण्यास राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही. पहिल्या सूचीत स्वतंत्र दुसरा विभाग करून त्यांना आरक्षणाचे फायदे मिळावेत. मात्र, असे करण्याचा अधिकार संसदेला आहे. त्यामुळे ही तरतूद मान्य करून राज्याने केंद्राकडे शिफारस करावी, अशी सूचना आपण राज्य सरकारला केली असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
 
पवार यांचे मोदींना पत्र
केंद्राच्या नोंदीमध्ये धनग‘ड’ असा उल्लेख असल्याने धनगर समजाला आरक्षणाचे फायदे मिळण्यात अडचणी येत आहेत. यामध्ये बदल करून धनग‘र’ असाही उल्लेख करावा, असे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. धनगर आरक्षणासंदर्भात संसदेत विषय आल्यावर आपला पक्ष त्याला मर्यादित ताकदीनिशी समर्थन करेल, असेही पवार यांनी नमूद केले.