पुण्यातील दांडेकर पूल येथील कालवा फुटी प्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उंदीर, घुशी आणि खेकडे यांनी भिंत पोखरल्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला होता. त्यावर आज पुण्यात स्वारगेट येथील जेधे चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून फ्लेक्सबाजी पहायला मिळाली.

‘उंदीर, घुशी आणि खेकडे यांनी भिंत पोखरल्यामुळे पुण्याचा कालवा फुटला, वेड्याचा बाजार, पेढ्यांचा पाऊस’ असा मजकूर असलेला फ्लेक्स राष्ट्रवादीने जेधे चौकात लावून गिरीश महाजन यांच्या विधानावर सडकून टीका केली.

पुण्यातील दांडेकर पूल येथील खडकवासला धरणाचा मुठा उजवा कालवा गुरुवारी फुटल्याने ४०० हून अधिक घरांचे नुकसान झाले. यानंतर घटनास्थळी राजकीय क्षेत्रातील मंडळींनी भेटी देऊन पीडित नागरिकांशी संवाद साधत मदतीची आश्वासने दिली. दरम्यान, शुक्रवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही येथील परिस्थीतीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उंदीर, घुशी आणि खेकडे यांनी भिंत पोखरल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचे महाजन यांनी म्हटले होते.

महाजन यांच्या या विधानाविरोधात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना पुण्यात फ्लेक्सबाजी पहायला मिळली. तसंही पुणे शहर पुणेरी पाट्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचाच प्रत्यय आज पहायला मिळाला. या फ्लेक्सची चर्चा पुणे शहरात ऐकण्यास मिळत आहे. मात्र, यावरुनही आता राजकारण पेटण्याची शक्यता असून भाजपाही राष्ट्रवादीच्या या टीकेला जोरदार उत्तर देऊ शकते.