शिरूरमधून लढण्याची अजित पवारांची घोषणा हवेतच

शिरूर लोकसभेसाठी कोणी सक्षम उमेदवार नसल्यास मीच लढतो, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. मात्र, ती घोषणा हवेतच विरली असून राष्ट्रवादीने भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना पुन्हा शिरूरच्या आखाडय़ात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अधिकृत घोषणा केलेली नाही. लांडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास शिरूरमध्ये २००९ मध्ये झालेली जुनी लढत पुन्हा नव्याने होणार आहे.

शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव शिरूरमधून सलग तीन वेळा निवडून आले असून यंदा ते चौथ्यांदा लोकसभेच्या रिंगणात आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत शिरूरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. दरवेळेप्रमाणे यंदाही आढळराव यांच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरू होता. विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील लोकसभेसाठी तयार झाले नाहीत. इतर काही नेत्यांकडे अजित पवारांनी शिरूरसाठी विचारणा केली होती. तथापि, कोणीही तयार झाले नाही. त्यामुळे पक्षाने आदेश दिल्यास मीच लढतो, असे विधान पवार यांनी केले. त्यावरून बराच राजकीय धुराळा उडाला. तथापि, अजित पवार लोकसभा लढणार नसल्याचे स्पष्ट झाले. अखेर, लांडे यांनाच तयार करण्यात आले आहे. लांडे अखेर तयार झाले असून आता ते प्रचारालाही लागले आहेत. मतदारसंघातील चौकाचौकात लागलेले फलक हा त्यांच्या तयारीचा भाग मानला जात आहे. २००९ मध्ये लांडे आणि आढळराव यांच्यात लढत झाली होती. तेव्हा सुमारे पावणेदोन लाख मतांनी लांडे यांचा आढळराव यांनी पराभव केला होता.

घरात सगळेच नगरसेवक

विलास लांडे यांचे घराणे राजकीय पार्श्वभूमीचे आहे. ते पिंपरी-चिंचवडचे महापौर होते. सलग १० वर्षे आमदारही होते. त्यांचे वडील विठोबा लांडे नगरपालिका असताना नगरसेवक होते. विलास लांडे यांची पत्नी मोहिनी पिंपरीच्या दोन वेळा नगरसेविका होत्या आणि त्यांनी अडीच वर्षे महापौरपद भूषवले आहे. बंधू विश्वनाथ लांडे देखील नगरसेवक होते. त्यांचा मुलगा विक्रांत लांडेही नगरसेवक आहे.