करोना संसर्गाने अत्यवस्थ असलेल्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभागात खाट हवी असेल तर थोरामोठय़ांच्या ओळखी असण्याला पर्याय नाही. तशा ओळखी नसतील तर तुमचा रुग्ण खाट मिळण्यापासून, पर्यायाने उपचारांपासून वंचित राहण्याचीच शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिल्ली येथील ‘लोकल सर्कल्स’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. देशातील तब्बल २११ शहरांतील नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. ज्यांच्या कुटुंबामध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये करोनाचे रुग्ण आहेत, त्या रुग्णांसाठी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात खाट मिळवण्याचे दिव्य ज्यांनी अनुभवले आहे अशा १७,००० नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. यांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल अडीच हजार नागरिकांचा समावेश आहे.

राज्यातील ३२ टक्के  नागरिकांना खाट मिळवण्यासाठी ओळखींचा वापर करावा लागला. १० टक्के  नागरिकांना त्यासाठी प्रचंड पाठपुरावा करावा लागला. एक टक्के  नागरिकांनी समाज माध्यमे किंवा अन्य मार्गाने शासन दरबारी तक्रारी के ल्या. ४४ टक्के नागरिकांना खाट मिळवण्यासाठी हे सर्व पर्याय वापरावे लागले. तीन टक्के  नागरिकांना लाच द्यावी लागली. पाच टक्के नागरिकांना अशी कोणतीही खटपट न करता खाट मिळाली, मात्र पाच टक्के नागरिकांना सर्व प्रयत्नांती खाट मिळालीच नाही.  राष्ट्रीय स्तरावरील माहितीचा विचार केला तर केवळ चार टक्के नागरिकांनी खाट मिळवण्यासाठी कोणतीही ओळख वापरावी लागली नसल्याचे म्हटले आहे. ३८ टक्के  नागरिकांना कोणाची तरी ओळख वापरल्यानंतर खाट मिळाली. सात टक्के  नागरिकांना खाटेसाठी ओळखीसह प्रचंड पाठपुरावाही करावा लागला. सात टक्के  नागरिकांना रुग्णालय किंवा शासकीय यंत्रणांना लाच द्यावी लागली. ४० टक्के नागरिकांना खाटेसाठी हे सर्व मार्ग अवलंबावे लागले. चार टक्के नागरिकांना मात्र सर्व प्रकारचे प्रयत्न करुनही खाट उपलब्ध झाली नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशभरातील ऑनलाईन माहिती फलकांवर रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती सातत्याने अद्ययावत करत राहाण्याची गरज ९२ टक्के नागरिकांनी व्यक्त केली आहे.