‘भारताच्या एकूण गरजेच्या ६५ टक्के खनिज तेलाचा पुरवठा आखाती देशांतून होतो. या देशांत सुमारे ८० लाख भारतीय काम करत असून त्यांचे उत्पन्न जवळपास ३५ अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत आहे. त्यामुळे आखाती देश व्यापार, रोजगार, खनिज तेल, सांस्कृतिक आणि राजकीयदृष्टय़ाही महत्त्वाचे असून त्यांच्याशी अधिक सहकार्याचे धोरण आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी शनिवारी केले.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘िलक वेस्ट – इंडिया’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात अन्सारी बोलत होते. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी उपस्थित होते.
यावेळी अन्सारी म्हणाले, ‘पíशयन आखात भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भारताची आíथक राजधानी मुंबई आणि बसरा, कुवेत, दम्माम, अब्बास आणि दुबई या आखाती देशातील व्यापारी शहरांमधील आंतर खूपच कमी आहे. ब्रिटिश राजवटीपासून आखाती देश आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील शहरांचे व्यापारी संबंध आहेत. दहशतवादी कारवाया आणि अमली पदार्थाची तस्करी यांच्या विरोधात भारत आणि या देशांनी सहकार्य करण्याचे ठरविले आहे. संरक्षणाच्या क्षेत्रात आखाती देशांशी सहकार्य करण्याच्या भारताच्या धोरणाबाबत पावले उचलण्यात आली आहेत. या देशांना गुंतवणुकीसाठी भारत योग्य वाटतो. भारत जागतिक पटलावर महत्त्वाची भूमिका बजाऊ शकतो, अशी या देशांची धारणा आहे.’