‘शिक्षण म्हणजे आयुष्याची पूर्वतयारी या पद्धतीने केवळ माहितीचे ओझे घेऊन वावरणारी एक पिढी तयार होते आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात माहितीत अग्रेसर असलेल्या माणसांची जागा यंत्रांनी घेतलेली असेल. हे वास्तव लक्षात घेत शिक्षणाकडे पाहाण्याच्या दृष्टिकोनात क्रांतिकारी बदल होण्याची गरज आहे,’ असे स्पष्ट मत डॉ. अभय बंग यांनी शुक्रवारी मांडले.

लोणावळा येथे मनशक्ती प्रयोग केंद्रातर्फे आयोजित ‘माणूस घडवणारे शिक्षण’ या विषयावरील शिक्षण परिषदच्या उद्घाटनावेळी डॉ. बंग बोलत होते. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. पंडित विद्यासागर, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, मनशक्ती प्रयोग केंद्राचे विश्वस्त प्रमोद शिंदे, गजानन केळकर, प्रल्हाद बापर्डेकर आदी या वेळी उपस्थित होते.

डॉ. बंग म्हणाले, की माणूस म्हणून घडवणारे शिक्षण आज गरजेचे असून त्यासाठी नई तालीमसारख्या पर्यायी शिक्षण प्रणाली विकसित झाली पाहिजे. अशी शिक्षण प्रणाली विकसित करताना जीवन हेच शिक्षण हे सूत्र लक्षात घेतले पाहिजे. आपल्या मातीत शिक्षण घेऊन त्याचा वैश्विक स्तरावर वापर करता आला पाहिजे. या पद्धतीने घडवणारी विश्व ही शाळा आणि स्व ही प्रयोगशाळा झाली पाहिजे, असे शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवणारे शिक्षणसूत्र स्वीकारण्याची गरज आहे.

‘उच्चशिक्षित समाज घडवून उपयोग नाही, तर तो समाज त्या शिक्षणाचा वापर कोणत्या उद्देशाने करणार आहे, यावर त्या देशाचे भविष्य अवलंबून असते. म्हणूनच चारित्र्यसंपन्न समाजनिर्मिती हे आपल्यासमोरचे उद्दिष्ट असले पाहिजे,’ असे सोळंकी यांनी सांगितले.