आपल्या देशाचा वारसा, संस्कृती, परंपरा जपायच्या असतील, तर त्यासाठी नागरिकांमध्ये आस्था असावी लागते आणि वारसा जपण्यासाठी चांगली व्यवस्थाही करावी लागते. परदेशात पर्यटन करताना या गोष्टी प्रकर्षांने जाणवतात. आपल्याकडे मात्र आस्था आणि व्यवस्थेबाबत आपण फारच उदासीन आहोत, अशा शब्दांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि ज्येष्ठ लेखिका मीना प्रभू यांनी पर्यटनातील त्यांची निरीक्षणे नोंदवली.
पुरंदरे प्रकाशनाने मीना प्रभू यांच्या बारा पुस्तकांचा संच उपलब्ध करून दिला असून त्या निमित्ताने ‘प्रवासनामा’ हा गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजकत्व ‘लोकसत्ता’चे होते. प्रवासवर्णनपर सर्वाधिक पुस्तके लिहिण्याचा विक्रम प्रभू यांनी केला असून त्यांना या कामगिरीसाठी आजवर अनेक पुरस्कारही लाभले आहेत. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांची कार्यक्रमात विशेष उपस्थिती होती. वाचनसंस्कृतीला साहाय्य करण्याची भूमिका ‘लोकसत्ता’ने नेहमीच घेतली आहे. त्यासाठी जे जे साहाय्य करता येईल ते ‘लोकसत्ता’ गेली अनेक वर्षे करत आहे. यापुढे चांगल्या योजनांच्या पाठीशी ‘लोकसत्ता’ असेल, असे संगोराम यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृत पुरंदरे यांनी केले.  
गप्पांमध्ये मीना प्रभू आणि बाबासाहेबांनी त्यांच्या विदेशातील, विशेषत: युरोपीय देशांमधील पर्यटनाचे अनुभव सांगितले. ‘तुम्हाला जगातलं सर्वात उत्कृष्ट शहर कोणतं वाटतं’ या बाबासाहेबांनी विचारलेल्या प्रश्नाने गप्पांना सुरुवात झाली. त्यावर मीना प्रभू यांनी ‘पुणं’ असं उत्तर देत ‘पुण्याच्या खालोखाल मला लंडन आवडतं’ असे सांगितले. लंडन शहराला १६६५ मध्ये लागलेल्या आगीत त्या शहराचे फार मोठे नुकसान झाले; पण त्यानंतर उभारणी करताना हे शहर अधिकाधिक सुंदर केले गेले, असे त्या म्हणाल्या.
युरोपीय देशांमध्ये ज्या ज्या वेळी गेलो त्या त्या वेळी तेथील वस्तुसंग्रहालये, ग्रंथालये, जुन्या इमारती यांना भेटी दिल्या. या सर्व वास्तू अतिशय योग्य पद्धतीने जतन करण्यात येत असल्याचे तेथे पहायला मिळते. अशा ठिकाणी आपण जातो तेव्हा तेथील संबंधित लोक त्या वास्तू अतिशय आस्थेने आपल्याला दाखवतात. त्यांची व्यवस्थाही अतिशय चांगल्या प्रकारे ठेवलेली असते. लाखो पुस्तकांचा संग्रह असलेल्या अनेक ग्रंथालयांमध्ये अभ्यासकांना हवे ते पुस्तक काही मिनिटांत उपलब्ध करून दिले जाते. तुम्ही खरोखरच विद्यार्थी आहात हे त्यांच्या लक्षात आले तर तुम्हाला सर्व ते साहाय्य तेथे केले जाते. आपल्याकडे असलेल्या वास्तूंबद्दलची, परंपरांची आस्था असल्याशिवाय हे घडू शकत नाही, असे बाबासाहेबांनी यावेळी सांगितले.
परदेशातील अनेक संग्रहालयांना भेटी दिल्या त्यावेळी देखील संग्रहालयातील दुर्मिळ आणि प्राचीन वस्तूंची, अप्रतिम चित्रांची अतिशय उत्तम प्रकारे व्यवस्था ठेवल्याचे आपल्याला पहायला मिळते. इंग्लंड असेल, युरोप असेल हे देश फार छान आणि स्वच्छ ठेवण्यात आले आहेत, असे सांगून प्रत्येक गोष्टीबाबत आम्ही अशी आस्था आणि व्यवस्था ठेवू का, असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मीना प्रभू यांच्या ‘न्यूयॉर्क न्यूयॉर्क- एका नगरात जग’ या नव्या पुस्तकाविषयीची माहिती दिली आणि या पुस्तकावर आधारित न्यूयॉर्कची सफर घडवणारा स्लाईड शोही सादर केला. न्यूयॉर्कची सफर घडवताना त्यांनी तेथील जुन्या वास्तू, इमारती यांचे वैशिष्टय़ सांगतानाच प्रत्येक इमारतीचा इतिहास व बारकावेही समाजावून सांगितले.