अनू आगा यांचे मत

पुणे : लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी मतदान करण्याचा अधिकार नागरिकांना असतो तसा आपल्या लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारण्याचा अधिकार देखील असतो. लोकप्रतिनिधी तुमच्या प्रश्नांना उत्तरे देणे लागतात याची त्यांना जाणीव करून देण्याची गरज आहे. चांगले राजकारणी लाभले तर भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे याबाबत मला कोणतीही शंका नाही, असे मत थरमॅक्सच्या माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यां अनू आगा यांनी मंगळवारी व्यक्त केले.

जनसेवा फाउंडेशनतर्फे ‘मीट द स्टॉलवर्ट’ या कार्यक्रमांतर्गत डॉ. वर्धमान जैन आणि नीरजा आपटे यांनी अनू आगा यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमात आगा यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. शां. ब. मुजूमदार, कृष्णकुमार गोयल, डॉ. विनोद शहा उपस्थित होते.

अनू आगा म्हणाल्या, कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी जे नियम तेच माझ्यासाठी हे तत्त्व मी पाळले आणि वयाच्या एकसष्ठाव्या वर्षी निवृत्त झाले. अनेक कंपन्यांवर अधिकार पदावर असलेले पुरूष निवृत्तीचा विचार करत नाहीत.

मात्र आपण पायउतार होण्याची वाट इतरांना पहायला लागू नये, त्याआधी आपण सन्मानाने निवृत्त होऊन नवीन पिढीकडे जबाबदारी सोपवावी असे मला त्यांना सांगावेसे वाटते.

पूर्वीच्या काळी कर्मचारी कंपनीशी एकनिष्ठ असत, आता प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा वाढल्याने कंपनीचा उपयोग हा प्रगतीतील एक टप्पा म्हणून केला जाताना दिसतो आणि कंपन्या देखील कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त काम करून घेण्याबाबत प्रयत्न करतात. सामाजिक जीवनात वावरताना देशाच्या खऱ्या समस्यांबाबत जाणीव झाली. कुपोषणाचे प्रमाण पाकिस्तान बांग्लादेश यांच्यापेक्षा भारतात अधिक आहे हे वेदनादायी आहे, असेही त्या म्हणाल्या.

ती वर्षे सगळ्यात निराशाजनक

राज्यसभेवर खासदार म्हणून काम करताना वाया जाणारा सभागृहाचा वेळ आणि देशाची संपत्ती यांमुळे यातना झाल्या. माझ्या कारकीर्दीतील ती वर्षे सगळ्यात निराशाजनक होती, त्यामुळे शत्रूवरही अशी वेळ येऊ नये असेच मला वाटले, असेही अनू आगा यांनी सांगितले.