देशातील विविध प्रांतांमध्ये रेशमी वस्त्रे तयार करणाऱ्या विणकरांना एकाच व्यासपीठावर त्यांच्या कलेचे प्रदर्शन करता यावे या उद्देशाने पुण्यात सात दिवसीय सिल्क इंडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात, कोलकाता, आसाम, बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आदी राज्यातून आलेल्या विणकरांनी त्यांची परंपरागत विणकामाची वस्त्रे गुरुवारी प्रदíशत केली. या प्रदर्शनात सहभागी विणकरांनी रेशमी कापडावर सुरेख चित्रे रंगवली आहेत. प्रदर्शनात महाराष्ट्राच्या रेशमी साडय़ांवरील विणकामाचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.

प्रदर्शनाचे आयोजक टी. अभिनंद यांनी ही माहिती दिली. म्हैसूर येथील ही संस्था देशभरातील विणकरांना व्यासपीठ उपलब्ध करून देते. भव्य प्रदर्शनात देशाच्या विविध प्रांतातील राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळविलेल्या विणकरांनी त्यांच्या रेशमी उत्पादनांचे प्रदर्शन केले असल्याचेही अभिनंद यांनी सांगितले.

या विणकरांनी साडय़ांवर कलात्मकरीतीने चित्रण केले आहे. घोडागाडी हाकणारे ग्रामीण जोडपे, विहिरीवर पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या महिला, मावळतीचे ग्रामीण जीवन आदींचे चित्रण करण्यात आले आहे. सिल्क प्रदर्शनीमध्ये महाराष्ट्राच्या विणकरांनी परंपरागत पठणी साडय़ांच्या विणकामाचे प्रात्यक्षिक सादर केले. हे प्रदर्शन ६ जुलपर्यंत सुरू राहणार आहे. कर्वे रस्त्यावरील सोनल हॉलमधील या प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते रात्री ९ अशी आहे.