डॉ. गणेश देवी यांचे मत

जगामध्ये लोकशाही पद्धती स्वीकारलेल्या देशांची वाटचाल ही आता हुकुमशाहीकडे होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत आपल्या देशातील लोकशाहीचा नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

विचारवेधद्वारे आयोजित कार्यक्रमात ‘वैचारिक आणीबाणी’ या विषयावर देवी बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ,   शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे, आयआयटी मुंबईचे प्रा. विजय नाईक, किशोर बेडकिहाळ, विजया चौहान या प्रसंगी उपस्थित होते. ‘विचारवेचे’ या दृक-श्राव्य सीडीचे प्रकाशन देवी यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले.

डॉ. देवी म्हणाले, आपल्या देशात मोठय़ा संख्येने असलेल्या युवा वर्गाला नव्या विचारांची आवश्यकता आहे. त्यासाठी विचारधारांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची नितांत गरज आहे. तसेच भाषेचा मोठय़ा प्रमाणावर वापर करण्याची आवश्यकता आहे. एकीकडे भाषा मरण पंथाकडे जात आहेत, तर दुसरीकडे मोबाईलसारख्या आधुनिक साधनांच्या माध्यमातून कृत्रिम संवाद वाढत आहे. श्रीमंती व गरिबी यांच्यातील तफावत वाढत आहे. अशा उंबरठय़ावर जगाची वाटचाल सुरू असताना आपल्याला विचारधारांचा नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.’

बाळ म्हणाल्या, सध्याची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता विचारवेध संमेलनाची आवश्यकता आहे. आपण ज्या विचारधारेला विरोध करतो, त्या विचारधारेला मानणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठावर बोलावले पाहिजे आणि त्यांचे विचार ऐकता आले पाहिजे. तुम्हाला त्यांचे विचार पटत नसल्यास त्यांना िहसक वळणाऐवजी विचारांनीच खोडता येण्याची गरज आहे.’

पानसे म्हणाले, धर्माचा विचार सोडून स्वत:चे आणि देशाचे भविष्य घडवणाऱ्या पिढीची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना देशातील सामाजिक आणि राजकीय विचारसरणी बाजूला ठेवून त्यांची विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती वाढविण्याची गरज आहे.