आपल्यापैकी अनेकजण बाहेर जाताना शेजाऱ्यांकडे चावी देऊन जातात. मात्र पुण्यामधील एका कुटुंबाला अशाप्रकारे शेजरी राहणाऱ्या महिलेवर विश्वास दाखवणे महागात पडलं आहे. शेजाऱ्यांच्या घराच्या चावीची बनावट चावी बनवून शेजरच्याच घरात चोरी केली प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. भारती असवानी (६०) आणि सुवर्णमला खंडागळे (६९) असं अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.

सपना शहा या महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वी बाहेर जाताना त्यांनी शेजाऱ्यांकडे घराची चावी ठेवली होती. त्यावेळी या महिलेने घराची बनावट चावी बनवून घेतली. त्यानंतर वेळोवेळी घर उघडून या महिलेने मैत्रिणीच्या मदतीने घरात चोरी केल्याचे शहा यांनी म्हटलं आहे. घरामध्ये लाखो रुपयांचे समाना चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

शहा कुटुंबीय जेव्हा जेव्हा काही दिवसांसाठी बाहेरगावी जायचे तेव्हा भारती सुवर्णमलाच्या मदतीने बनावट चावीने घर उघडून चोरी करायची. असा हा प्रकार दोन वर्ष सुरु होता. जून २०१८ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान भारती आणि सुवर्णमलाने शहा यांच्या घरातून हळूहळू सात लाख ४२ हजारांची चोरी केली. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कमेचा समावेश आहे.

दोन वर्षामध्ये घरात अनेकदा चोरी झाल्याने अखेर शहा कुटुंबाने बेडरुममध्ये छुपा कॅमेरा बसवला. या कॅमेराचा अॅक्सेस त्यांनी मोबाइलवर घेतला. शहा यांनी आम्ही मुंबईला जात असल्याचे शेजाऱ्यांना सांगितलं. मात्र मुंबईला न जाता शहा कुटुंब पुण्यातील दुसऱ्या घरी थांबले. शेजारी बाहेर गेल्याचे समजल्यानंतर भारती बनावट चावीच्या मदतीने घरात शिरली आणि शोधाशोध करु लागली. त्याचवेळी शहा कुटुंबाने त्यांना रंगेहाथ पडले.