22 November 2019

News Flash

नेपाळी नोकर दाम्पत्याने दरोड्यासाठी वापरले ८९ सिम कार्ड

दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचा पोलिसांना संशय आहे

भारतीय वायुदलात ग्रुप कॅप्टन असलेल्या अदिकाऱ्याच्या घरी चोरी करण्यासाठी नेपाळी नोकर दाम्पत्याने ८९ सिम कार्ड वापरल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान ८९ सिम कार्डसाठी देण्यात आलेली सगळी कागदपत्रं खोटी आहेत असंही पोलिसांनी सांगितलं आहे. ही कार्ड घेण्यासाठी गीता, लक्ष्मी ही दोन नावं सर्वाधिकवेळा वापरली गेली आहेत. गीता आणि महेश अशी या दोघांची नावं आहेत असं पोलिसांनी सांगितलं आहे.

या प्रकरणी प्राची दीपक नेरकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काशिनाथ महादू नेरकर-७७ , सुमन काशीनाथ नेरकर वय-६७ आणि दीपक काशिनाथ नेरकर वय-५० सर्व रा.महेशनगर, पिंपरी या तिघांना जेवणातून गुंगीचे औषध देण्यात आले होते. नेरकर कुटुंब हे गेल्या अनेक वर्षांपासून महेश नगर येथे वास्तव्यास असून त्यांचा समीर नावाचा बांगला आहे. मुलगा समीर हा एअरफोर्समध्ये होता तो शाहिद झाला. त्यानंतर त्याच नाव बंगल्याला देण्यात आलं होतं.

दीपक नेरकर हे देखील एअरफोर्समध्ये आहेत नुकतीच त्यांनी सुट्टी घेऊन पत्नी आणि मुलीसह पिंपरी मध्ये आले होते. खूप दिवसानंतर मुलगा येणार असल्याने वडील काशीनाथ नेरकर यांनी नेपाळी नोकर दाम्पत्य कामासाठी ठेवलं होतं. ११ जून रोजी दीपक यांची पत्नी या दोन्ही मुलींना घेण्यासाठी पुण्यात गेल्या होत्या. तेव्हा, घरात नेपाळी नोकर दाम्पत्य आणि वृद्ध आई वडील आणि मुलगा दीपक हेच होते. दुपारी जेवणाची वेळ झाली असता नोकर दाम्पत्याने तिघांच्या जेवणात गुंगीचे औषध टाकले. त्यानंतर तिघांना झोप लागली त्यामुळे त्यांना काही समजत नव्हतं, याचाच फायदा घेत नेपाळी नोकर दाम्पत्याने घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली.

दीपक यांची पत्नी आणि दोन्ही मुली दुपारी घरी आल्यानंतर दरवाजा दीपक यांनीच उघडला. परंतु, त्यांना काहीच समजत नव्हतं, ते पुन्हा घरात जाऊन झोपले. सायंकाळी चहा ची वेळ झाल्यानंतर नोकर दाम्पत्याला आवाज दिला असता ते नव्हते. घराचा पाठीमागील दरवाजा उघडा होता. घरातील कपाट उचकटलेले होते, हे सगळा प्रकार पाहिल्यानंतर घरात काहीतरी घडलंय हे समोर आलं तसेच घरातील झोपलेले व्यक्ती आणखी देखील उठत नसल्याने संशय आला त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. तोपर्यंत नोकर दाम्पत्य निघून गेलेलं होते.

दरम्यान, पोलिसांच्या तांत्रिक तपासात या नोकर दाम्पत्याने तब्बल ८९ सिमकार्ड गुन्ह्यात वापरले असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व सिमकार्ड घेण्यासाठी नोकर दाम्पत्याने बोगस कागदपत्र वापरली असून ते सध्या परराज्यात असल्याचे आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. दोघे सराईत गुन्हेगार असल्याचा संशय पोलिसांना आहे.

 

First Published on June 20, 2019 10:50 am

Web Title: nepali couple use 89 sim cards for robbery scj 81
Just Now!
X