वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक होण्यासाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी-नेट)  स्थगित करण्यात आली आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनटीए) परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला असून, परीक्षेची नवी तारीख परीक्षेपूर्वी किमान पंधरा दिवस आधी जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

एनटीएतर्फे  संगणकावर आधारित यूजीसी-नेट परीक्षा २ ते १७ मे दरम्यान देशभरातील केंद्रांवर घेण्यात येणार होती. करोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द केली, तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली.

त्यानंतर अन्य मंडळांनीही नियोजित परीक्षा स्थगित केल्या. त्यामुळे यूजीसी-नेट परीक्षा होणार की नाही असा  प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर एनटीएने उमेदवारांचे आरोग्य आणि सुरक्षितता विचारात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे  मंगळवारी परिपत्रकाद्वारे जाहीर केले. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी ugcnet@nta.ac.in या ई मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.