पुणे शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत असून आज दिवसभरात १३६ नवे रुग्ण आढळले आहे. तर त्याच दरम्यान १४ दिवसानंतर अहवाल निगेटिव्ह आलेल्या ९६ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. एका बाजूला आज रुग्ण वाढले, तर दुसर्‍या बाजूला तेवढ्याच प्रमाणात रुग्ण ठणठणीत होऊन बाहेर पडल्याने समाधानाची बाब असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे पुणेकर नागरिकांनी येत्या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचं आजच्या आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे.

पुणे शहरात मागील काही दिवसात रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने प्रशासनामार्फत अनेक उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, त्याच दरम्यान शनिवारी दिवसभरात पुण्यात १३५ रुग्ण आढळले आहे. त्यामुळे आतापर्यंत पुण्यातील करोनाग्रस्तांची संख्या २ हजार ३८० इतकी झाली आहे.

तर आजच्या एकाच दिवसात ४ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आतापर्यंत मृतांची संख्या १४० वर पोहोचली आहे. तर आज १४ दिवसांनंतर काही रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिवसभरात तब्बल ९६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयातून सोडण्यात आलेल्यांची एकूण संख्या ८२६ इतकी संख्या झाली असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे.