वाढीव दरातील निविदा, त्रुटींमुळे प्रकल्प आवाक्याबाहेर

पुणे : उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गासाठी (हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट – एचसीएमटीआर) वाढीव दराने आलेल्या निविदा, त्रुटी, आखणीतील बदल आणि खर्चाचा आवाक्याबाहेर गेलेला खर्च या पाश्र्वभूमीवर वर्तुळाकार मार्गाबाबत संदिग्धता निर्माण झाली असतानाच आता या मार्गासाठी पुन्हा नव्याने सल्लागार नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आखणीतील बदल वादग्रस्त ठरत असल्यामुळे मार्गाचा पुन्हा नव्याने सविस्तर प्रकल्प आराखडा करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने तीस वर्षांपूर्वी मध्यवर्ती भागातून ३६.६ किलोमीटर लांब आणि २४ मीटर रुंदीचा वर्तुळाकार मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. शहरातील प्रमुख साठ रस्ते या मार्गाने जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या वादग्रस्त ठरला आहे. अपेक्षित खर्चापेक्षा वाढीव आणि चढय़ा दराने निविदा आल्यामुळे प्रकल्पाच्या व्यवहार्यतेबद्दल, गुणवत्तेबद्दल शंका उपस्थित  करण्यात आल्या आहेत. पाच हजार १९२ कोटींचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आलेली निविदा सात हजार ५३५ कोटी रुपयांची आहे. प्रकल्पाचा एक तृतीयांश मार्ग बदलण्यात आला आहे, त्यामुळे निविदा प्रक्रिया अवैध ठरत आहे. ऐंशी टक्के भूसंपादन झालेले नसताना निविदा प्रक्रिया राबविता येत नाही, या परिपत्रकाकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे, असे विविध आक्षेप सध्या घेण्यात आले आहेत. या पाश्र्वभूमीवर वाढीव दराने आलेल्या निविदा रद्द होण्याची दाट शक्यता आहे.

वर्तुळाकार मार्गाच्या कामांसाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र त्या वेळी मार्गाची आखणी आणि भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. एमआरटीपी कायद्यान्वये ८० टक्के क्षेत्र ताब्यात आल्याशिवाय निविदा प्रक्रिया राबविता येत नाही. मात्र जागा ताब्यात नसतानाही निविदा राबविण्यात आल्याचे पुढे आले होते. मार्गाच्या आखणीमध्ये बदल किंवा सुधारणांना मान्यता देण्यापूर्वी त्याबाबत हरकती-सूचना मागविणे अपेक्षित होते. त्यावर सुनावणी घेऊन आखणीत बदल करणे अपेक्षित होते. मात्र या प्रक्रियेलाही छेद देण्यात आला असून आधी आखणीतील बदलांना मान्यता नंतर हरकती-सूचना आणि सुनावणी अशी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यातही बदलांचे नकाशे महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ही सर्व प्रक्रियाच वादग्रस्त ठरली आहे.

या पाश्र्वभूमीवर प्रशासनाकडून मार्गाचा सुधारित आराखडा करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. मार्गाच्या वाढीव खर्चावरून वाद आणि टीका होत असल्यामुळे स्थायी समितीने तो काही दिवसांपासून पुढे ढकलला होता. मात्र दोन कोटी रुपये खर्च करून सल्लागाराकडून सुधारित सविस्तर प्रकल्प आराखडा करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे यानिमित्ताने पुन्हा खर्च होणार आहे.

वर्तुळाकार मार्ग असा

खडकी, औंध, शिवाजीनगर, एरंडवणे, कोथरूड, मुंढवा, कल्याणीनगर, येरवडा आणि कळस या भागातून हा रस्ता प्रस्तावित आहे. एकूण ३६.६ किलोमीटर लांबीचा हा रस्ता उन्नत स्वरूपाचा आहे. रस्त्याची रुंदी २४ मीटर असून सहा मार्गिका (लेन) आहेत. त्यापैकी दोन मार्गिका बीआरटीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्गाला वर्तुळाकार मार्ग जोडला जाणार असून बीआरटीसाठी २८ स्थानके प्रस्तावित आहेत. यांत्रिकी जिन्यांची (एलेव्हेटर्स) सुविधा पादचाऱ्यांसाठी असणार आहे.

अकरा ठिकाणी बदल

मार्गातील अकरा ठिकाणी बदल करण्यात आले आहेत. लोहगांव, वडगांवशेरी, बोपोडी, वानवडी, बिबवेवाडी, कोथरूड येथील काही भागांचा यामध्ये समावेश असून हे बदल ७०० ते ८०० मीटर अंतरांचे आहेत. या बदलांवर हरकती-सूचना मागविण्यात आल्या असून त्यानंतर सुधारित मार्ग निश्चित केला जाणार आहे. सुधारित आखणी रद्द करावी आणि मूळ मार्ग कायम ठेवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. हरकती सूचना नोंदविणाऱ्यांमध्ये संस्था आणि वैयक्तिक हरकतींचा समावेश आहे.