‘भारतात संशोधनाची प्राचीन परंपरा होती. मात्र, कालांतराने त्यात खंड पडल्यामुळे भारताचा विकास मंदावला. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी देशातील उच्च शिक्षणाच्या विकासासाठी नवे प्रयोग होणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) संस्थेच्या पदवीदान समारंभात रविवारी केले.
आयसर, पुणेचा तिसरा पदवीदान समारंभ रविवारी झाला. त्या वेळी राज्यपाल के. शंकरनारायणन, मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आयसर पुणेचे संचालक डॉ. के. गणेश, गव्हर्निक काऊन्सिलचे अध्यक्ष टी. व्ही. रामकृष्णन आदी उपस्थित होते. या वेळी आकाश गुरू या विद्यार्थ्यांला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. यावर्षी आयसरमध्ये १३ विद्यार्थ्यांना पीएच.डी आणि ९४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी आयसर, पुणेच्या नव्या इमारतीचे अनावरणही मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी राष्ट्रपती म्हणाले, ‘‘जागतिक पातळीवर टिकून राहण्यासाठी आणि देशाचा विकास साधण्यासाठी संशोधन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सध्या संशोधनाला चालना देण्यासाठी देशात चांगल्या संस्था उभ्या राहात आहेत, चांगले शिक्षकही आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या दोनशे विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही, हे खेदजनक आहे. जागतिक पातळीवर भारताचे स्थान टिकण्यासाठी उच्च शिक्षणामध्ये नावीन्य आणणे आवश्यक आहे. युवाशक्ती हे भारताचे बलस्थान आहे. या शक्तीला योग्य वळण मिळण्यात उच्च शिक्षणाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास झाला पाहिजे. शिक्षणातील संख्यात्मक विकासाबरोबरच गुणात्मक वाढीकडेही लक्ष दिले पाहिजे.’’