संगीताच्या क्षेत्रात सतत नवनवीन प्रयोग करत राहणे कोणत्याही कलावंतामध्ये असलेली कला ताजी ठेवण्यासाठी महत्त्वाचे असते, असे मत युवा पिढीचे लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांनी व्यक्त केले.

‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ उपक्रमात प्रसिद्ध संवादिनीवादक आणि संगीत अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे यांनी देशपांडे यांच्याशी संवाद साधला. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी देशपांडे यांना बोलते केले.

ते म्हणाले, संगीत केवळ दाद किंवा पैसे मिळविण्यासाठी करू नये असे वाटते. रियाज हा रंगांच्या डबीसारखा आहे. त्यातून कोणता रंग किती वापरायचा हे मैफिलीमध्ये उमजले पाहिजे. बंदिशीकडून रागाकडे पाहण्याची दृष्टी मिळू लागल्याने काय करायचे हे आता समजू लागले आहे. चित्र डोळ्यासमोर असेल तर मजा नाही. ते भासले पाहिजे किंवा आत उमटत असेल तरच मजा येते. सुरांमध्ये उडी मारून पोहण्याचा आनंद लुटावा अशा एका टप्प्यावर आता मी आहे. नाटय़गीत, ठुमरी, गज़्‍ाल यामध्ये शब्दांचा भाव महत्त्वाचा असतो. तर, शास्त्रीय संगीतामध्ये एकच गोष्ट दरवेळी नव्याने पाहता येण्याची प्रक्रिया मला आवडते. ‘दोन तंबोऱ्यांमध्ये बसून गाणारा गवई’ हीच ओळख व्हावी, अशी माझी इच्छा आहे.

झाड म्हणून वाढण्यासाठी..

मैफिलीमध्ये मी श्रोत्यांवर हक्क गाजवतो. पहिल्या भागामध्ये मला जे ऐकवायचे असते, तेच मी सादर करतो. मध्यंतरानंतर रसिकांना हवे ते मी गातो. त्यातून मला फर्माईशी येतात. ही त्याचीच उपलब्धी आहे, असे राहुल देशपांडे यांनी सांगितले. आता ‘घेई छंद’, ‘सुरत पिया बिन’ मी आवर्जून गात नाही. झाड म्हणून मला वाढायचे असेल तर हेतुपुरस्सर अशी एक एक फांदी मला कापत गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मुकुल शिवपुत्र यांनी सांगितल्यानुसार सौंदर्यदृष्टी विकसित होण्यासाठी लता मंगेशकर, आशा भोसले आणि महंमद रफी यांची चित्रपट गीते आवडीने ऐकतो, असेही त्यांनी सांगितले.