पिंपरी नवनगर विकास प्राधिकरणाने वाल्हेकरवाडीच्या गृहप्रकल्पानंतर भोसरी येथील पेठ क्रमांक १२ मधील चार हजार ८८३ सदनिकांचा गृहप्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाला प्राधिकरण सभेत मंजुरी देण्यात आली असून येत्या तीन-चार दिवसात प्रकल्पाच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाची सभा पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य सचिव सतीशकुमार खडके तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे आणि प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. पिंपरी प्राधिकरणाने गेल्या वीस वर्षांपासून एकाही नवीन गृहप्रकल्पाचे काम हाती घेतले नव्हते. पेठ क्रमांक ३० आणि ३२ मधील गृहप्रकल्प वीस वर्षांनंतर सुरु झाला. या गृहप्रकल्पाचे कामही रखडले होते. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकरी खडके यांनी त्या गृहप्रकल्पाच्या ठेकेदाराला दैनंदिन १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यामुळे आता कामाचा वेग थोडा वाढला आहे. या प्रकल्पामध्ये ७८९ सदनिकांचा समावेश आहे. त्यानंतर आता भोसरी येथील पेठ क्रमांक १२ मध्ये चार हजार ८८३ सदनिकांच्या गृहप्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून प्रकल्पाचे अंदाजपत्रकही मंजूर करण्यात आले आहे.

गृहप्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यामुळे प्रकल्पाच्या कामासाठी तीन-चार दिवसात निविदा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. पेठ क्रमांक १२ या गृहप्रकल्पामध्ये आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील नागरिकांसाठी तीन हजार ३१७ , कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी एक हजार ५६६ सदनिका तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामध्ये १४० दुकाने तयार करण्यात येणार आहेत. याशिवाय रहिवाशांसाठी इतर सुविधाही पुरविण्यात येणार आहेत. त्यात उद्यान, क्लब हाऊस आदी सुविधांचा समावेश आहे. प्राधिकरण सभेत पेठ क्रमांक ९ मधील ४२ एकर जागेवर शैक्षणिक संकुल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या संकुलाच्या रेखांकनाला मंजुरी देण्यात आली आहे. वाकड येथील पेठ क्रमांक २० मध्ये पाण्याच्या टाकीसाठी जागा देण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे.

पेठ क्रमांक १२ मधील गृहप्रकल्पाच्या निविदा येत्या तीन-चार दिवसात प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. प्रकल्प अडीच वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

– सतीशकुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी प्राधिकरण