अवघा ९.७९ अब्ज घनफूट पाणीसाठा शिल्लक

पुणे : शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीमधील चार धरणांमध्ये पावसाने ओढ दिल्याने अवघा ९.७९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. या धरणांमधील पाणी ग्रामीण भागाला शेती आणि पिण्यासाठी देण्यात येत असल्याने उपलब्ध पाणीसाठा के वळ तीन महिने पुरणार आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्यास उपलब्ध पाणीसाठय़ाचे नव्याने नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात येणार आहे.

टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या वर्षी २६ जुलै रोजी ही चारही धरणे १०० टक्के  भरली होती. यंदा ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे जूनच्या पहिल्या आठवडय़ात धरण परिसरात काही दिवस दमदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे नव्याने नियोजन करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. सध्या चारही धरणांत मिळून एकू ण ९.७९ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामध्ये टेमघर धरणात ०.७१ टीएमसी, वरसगाव आीिण पानशेत धरणांत अनुक्रमे चार आणि ४. ३३ टीएमसी, तर खडकवासला धरणात ०.७४ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. याबाबत बोलताना खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील म्हणाले, ‘धरण परिसरात जुलै आणि ऑगस्ट या काळात पाऊस पडतो. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होत जाते. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार जुलैअखेपर्यंत शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे तुडुंब भरतात. साधारणत: १५ ऑक्टोबपर्यंत पाऊस पडतो. त्यादृष्टीने पाण्याचे नियोजन करण्यात येते’.

दरवर्षी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १५ ऑगस्टपर्यंत पाऊस पडतो. आगामी १५ दिवसांत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण पाहून भविष्यातील नियोजन के ले जाणार आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास १० ते १५ ऑगस्ट या कालावधीत धरणांतील उपलब्ध पाण्याचा आढावा घेऊन पाण्याचे नव्याने नियोजन करावे लागणार आहे.

– विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग