कचरा गोळा करण्याच्या ढकलगाडय़ा खरेदी करण्यात तब्बल ४४ लाख रुपये जादा मोजले जात असल्याचा महापालिकेतील प्रकार उघडकीस आलेला असतानाच शेकडो नव्या कोऱ्या ढकलगाडय़ा कात्रज येथे गेली दोन वर्षे भंगार अवस्थेत पडून असल्याची माहिती बुधवारी समोर आली. त्यामुळे नव्या गाडय़ा खरेदी करण्याऐवजी या गाडय़ाच आता कोणीतरी ढकला, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागामार्फत कचरा गोळा करण्याच्या गाडय़ा न घेता घन कचरा विभाग, क्षेत्रीय कार्यालये तसेच व्हेइकल डेपोमार्फत या गाडय़ांची परस्पर खरेदी केली जात आहे. त्यामुळे या गाडय़ांच्या खरेदी प्रक्रियेत ४४ लाख रुपये जादा मोजले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अशा प्रकारे खरेदी न करता कररूपाने दिलेल्या पैशांचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी सजग नागरिक मंचने आयुक्तांकडे बुधवारी केली आहे.
जादा दराने खरेदी होत असल्याच्या या प्रकारापाठोपाठ कात्रज प्रभागाचे नगरसेवक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेता वसंत मोरे यांनी गुरुवारी नव्या कोऱ्या ढकलगाडय़ांची कशी धूळधाण झाली आहे ते निदर्शनास आणून दिले आहे. धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाने कात्रज येथे नव्या कोऱ्या ढकलगाडय़ा गेली दोन वर्षे ठेवल्या असून या नव्या गाडय़ा सध्या अतिशय वाईट अवस्थेत पडल्या आहेत. सध्या ज्या गाडय़ा वापरात आहेत, त्या गाडय़ांच्या काही भागांची दुरुस्ती निघाली की या नव्या गाडय़ांचे सुटे भाग काढून त्या गाडय़ांना बसवले जातात. त्यामुळे या गाडय़ा निरुपयोगी झाल्या आहेत. या सर्व गाडय़ांची दुरुस्ती करून त्यांचा वापर करणे शक्य असताना आणखी लाखो रुपये खर्च करून नवीन गाडय़ांची खरेदी करणे चुकीचे आहे, असे पत्र मोरे यांनी बुधवारी आयुक्तांना दिले.
एकाच क्षेत्रीय कार्यालयाने खरेदी केलेल्या गाडय़ा एवढय़ा मोठय़ा संख्येने पडून असतील, तर सर्व पंधरा कार्यालयांच्या अशा किती गाडय़ा विनावापर पडून आहेत त्यांचीही माहिती गोळा करावी आणि सर्व गाडय़ा वापरात आणाव्यात, अशीही मागणी मोरे यांनी केली आहे.