पुणे महापालिकेच्या हद्दीत आणखी सहा गावे समाविष्ट करण्याचा निर्णय विधी समितीच्या बैठकीत गुरुवारी बहुमताने घेण्यात आला. या प्रस्तावाला काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. या निर्णयानुसार आता नांदोशी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी आणि कोळेवाडी ही दक्षिण पुणे परिसरातील गावे महापालिकेच्या हद्दीत येण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
जी गावे हद्दीत समाविष्ट करावीत असा निर्णय झाला आहे ती गावे शहरालगत असल्यामुळे तेथील नागरीकरणाचा वेग झपाटय़ाने वाढत असून त्यामुळेच या गावांमध्ये अनियंत्रित विकास झाला आहे. तसेच गुंठेवारीही मोठय़ा प्रमाणावर होत आहे. ही गावे सध्या महापालिका हद्दीलगत असून तेथे नागरी सुविधा विकसित करण्यासाठी जी आरक्षणे ठेवावी लागतात त्यांचाही अभाव आहे. तसेच या गावांमध्ये रस्त्यांचे प्रभावी जाळे असण्याचीही आवश्यकता असली, तरी त्याचीही उणीव गावांमध्ये आहे. या परिस्थितीतून मार्ग काढून गावांमध्ये सुनियोजित विकास करण्यासाठी तसेच तेथे चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने हद्दीलगतची सहा गावे महापालिकेत घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तो मंजूर झाला आहे.
विधी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला विरोध झाल्यामुळे त्यावर मतदान घेण्यात आले आणि सहा विरुद्ध पाच अशा मतांनी प्रस्ताव मंजूर झाला. महापालिका हद्दीत २८ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने यापूर्वीच घेतला असून त्याची पुढील प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.
महापालिका हद्दीत यापूर्वीच समाविष्ट झालेल्या गावांसाठी व शहरासाठी मिळून पालिकेने शासनाकडे वार्षिक १८.९४ टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. तसेच जी गावे नव्याने समाविष्ट होणार आहेत त्यासाठी वाढीव साठा मिळावा अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच गावे समाविष्ट झाल्यामुळे ज्या सोयी-सुविधा पुरवाव्या लागतील त्यासाठी शासनाकडून अतिरिक्त सेवकवर्ग मंजूर होणेही आवश्यक आहे. तसेच या सुविधा देण्यासाठी शासनाने शंभर टक्के अनुदान द्यावे अशीही मागणी आहे. या सर्व मागण्यांचा प्रस्ताव राष्ट्रवादीतर्फे देण्यात आला होता. हा प्रस्तावही बहुमताने मंजूर करण्यात आला.