राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी ‘नवा गडी नवं राज्य’ अशी भूमिका घेऊन विविध समित्या, मंडळे यांचे सदस्य बदलले आहेत. आता राज्यातील अभ्यासक्रमही बदलण्याची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली असून सहावी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ाप्रमाणे राज्याचाही अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला. पहिली ते आठवीचा नवा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागूही करण्यात आला. नव्या आराखडय़ानुसार पाठय़पुस्तक मंडळाने पुस्तके तयार करण्याचे कामही हाती घेतले. २०१३ पासून आतापर्यंत पाचवीपर्यंतची नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकेही लागू करण्यात आली. सहावी मात्र, त्यानंतरची प्रक्रिया थांबवून आता सहावीपासूनचा अभ्यासक्रम बदलण्यात येत आहे. त्यासाठीची तयारीही सुरू झाली आहे.
उच्चप्राथमिक, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक स्तराचा म्हणजेच सहावी ते बारावीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. त्यासाठी अभ्यास मंडळेही नव्याने स्थापण्यात येणार आहेत. अभ्यासमंडळांसाठी सदस्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. सध्या अभ्यास मंडळातील सदस्य नियुक्तीसाठी तज्ज्ञांची माहिती गोळा करण्यात येत आहे. हजारापेक्षा जास्त नावांचे प्रस्ताव समोर असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. मात्र, सुरू झालेल्या या नव्या प्रक्रियेमुळे सहावी ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आतापर्यंत केलेल्या कामाचे काय, असा प्रश्न अभ्यासक्रम मंडळातील सदस्यांना पडला आहे. पुढील वर्षांपासूनच बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके लागू होणार आहेत. दरवर्षी एकाच इयत्तेचे नवे पुस्तक लागू केले जाणार आहे.

सहावी ते बारावी एकच अभ्यासमंडळ?
पहिली ते आठवीचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद तयार करते, त्याची पाठय़पुस्तके बालभारती तयार करते. नववी ते बारावीचा अभ्यासक्रम राज्य मंडळ तयार करते. या तिन्ही संस्था आपापली स्वतंत्र अभ्यासमंडळे नेमून काम आपापल्या पातळीवर काम करतात. या तिन्ही संस्थांमधील वादही शिक्षण विभागात नेहमीच चर्चेत असतात. मात्र आता सहावी ते बारावीसाठी प्रत्येक विषयासाठी एकच अभ्यासमंडळ नेमण्याच्या दृष्टीने सध्या विचार करण्यात येत आहे. सहावी ते बारावीच्या अभ्यासक्रमांत सलगता असावी म्हणून आराखडा आणि पाठय़पुस्तकांसाठी एकच अभ्यासमंडळ नेमण्याचा विचार करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.