बंगळुरुवरुन पुण्यात आलेल्या एका इंजिनिअरला रिक्षा चालकाने गंडा घातला आहे. फक्त १८ किमीसाठी त्या इंजिनिअरकडून थोडे थोडके नव्हे चार हजार ३०० रूपये पैसे उकळले. येरवाडा पोलिस स्टेशनमध्ये रिक्षाचालकाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  बंगळुरूवरून पुण्यात आलेल्या इंजिनिअरच्या आयुष्यातील सर्वात महागडा रिक्षा प्रवास असेल. बुधवारी कामानिमित्त तो पुण्यात पोहचला. कात्रजपासून येरवडापर्यंतच्या १८ किमीच्या प्रवासासाठी त्या व्यक्तीला तब्बल ४३०० रुपये मोजावे लागले.

पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, कात्रज-देहू रोड बायपासवर पहाटे ५ वाजता उतरला. त्यावेळी पुण्यात पहिल्यांदाच आल्याने त्या व्यक्तीने ऑनलाइन कॅब बुक करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी त्याला एकही कॅब मिळाली नाही. त्यामुळे त्याने रिक्षा केली.

तक्रार करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितल्यानुसार, रिक्षाचालकाने दारू प्यायली होती. पहाटे इतर कोणताही पर्याय नसल्यामुळे रिक्षा केली. यावेळी रिक्षा चालकाने या तरुणाला असं सांगितलं की, मीटरप्रमाणे जेवढं भाडं होईल तेवढं द्यावं. पण यावेळी तरुणाने लक्ष दिलं नाही की, रिक्षा चालकाने मीटर शून्यावर सेट केलं की नाही ते. जेव्हा तो येरवड्याला पोहचला त्यावेळी रिक्षाचालकाने त्याच्याकडून तब्बल ४३०० रुपये उकळले.

जेव्हा त्याने या गोष्टीला विरोध केला त्यावेळी त्याला रिक्षा चालकाने असं सांगितलं की, ६०० रुपये शहरात प्रवेश करण्याचे आणि ६०० रुपये शहरातून बाहेर पडण्याचे. त्यानंतर बाकी सर्व भाडं आहे. या सर्व प्रकारानंतर तरुणाने रिक्षा चालकाविरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली. पोलिस रिक्षाचालकाचा तपास घेत आहेत.