नव्या योजनेद्वारे पहिल्या वाहनाची नोंदणी

पुणे : नवे वाहन घेतल्यानंतर त्याच्या नोंदणीची प्रक्रिया आता वाहन वितरकच करणार आहे. या योजनेचे सोमवारी लोकार्पण होताच त्यात पुणे शहराने पुढाकार घेत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत राज्यातील पहिल्या वाहनाची नोंदणी केली.

आरटीओऐवजी वाहन वितरकांकडून वाहनांची नोंदणी आणि घरी बसून शिकाऊ वाहन परवान्याची चाचणी देण्याच्या योजनेचे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या योजनेनुसार वाहन वितरकांनी वाहन विक्रीसह त्याची संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत नोंदणीही सुरू केली. योजनेचे लोकार्पण होताच काही वेळातच पुण्यातील बी. यू. भंडारी या वाहन वितरकाने राज्यातील पहिल्या वाहनाची नोंद केली. प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, आरटीओचे प्रणाली व्यवस्थापक मनोज बागमार, ग्राहक ऐश्वर्या भांगे आदी त्या वेळी उपस्थित होते.

वाहन नोंदणीच्या पूर्वीच्या प्रक्रियेमध्ये वाहनाच्या खरेदीनंतर त्याच्या नोंदणीसाठी वितरकाकडून आवश्यक ती कागदपत्रे आरटीओ कार्यालयात पाठविली जात होती. तेथे संबंधित अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी करून स्वाक्षरी झाल्यानंतरच वाहन नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत होती. आता

‘डिलर पॉईंट न्यू रजिस्ट्रेशन प्रणाली’नुसार वाहनांची नोंदणी होणार आहे. यामध्ये वाहनांच्या नोंदणीसाठी करावी लागणारी संपूर्ण प्रक्रिया वाहन वितरकच करणार आहेत.

पसंतीचे क्रमांक ‘आरटीओ’कडेच

नव्या योजनेनुसार वाहनांच्या नोंदणीची प्रक्रिया वितरकांकडून करण्यात येणार असली, तरी पसंतीचे किंवा आकर्षक क्रमांक देण्याचे अधिकार आरटीओलाच राहणार असून, त्यासाठी कार्यालयात जावे लागणार आहे. पसंतीचे आणि आकर्षक क्रमांक घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातून आरटीओला मोठय़ा प्रमाणावर उत्पन्नही मिळते. त्यासाठीही सर्व प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच असणार आहे.

 

वितरकांकडूनच वाहनांच्या नोंदणीच्या योजनेचे मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केले. या योजनेचे स्वागत करून कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पुण्यात पहिल्या वाहनाची नोंद करण्यात आली. या योजनेचा नागरिकांना लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे आरटीओ कार्यालयावरील ताणही कमी होऊ शकणार आहे. -डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे</strong>