गतवर्षीच्या तुलनेत दसरा वाहनखरेदीत काहीशी घट

पुणे : गतवर्षीच्या तुलनेत यंदा करोना कालावधीतील दसऱ्याच्या मुहूर्तावरील नव्या वाहनांच्या खरेदीत काही प्रमाणात घट झाली असली, तरी शहरांतर्गत प्रवासाच्या दृष्टीने खासगी वाहनांची गरज मात्र घटली नसल्याचे दिसून येते. यंदा दसऱ्याच्या कालावधीत दुचाकी आणि चारचाकी मिळून ६,१३२ नव्या वाहनांची खरेदी झाली. गतवर्षी दसऱ्याच्या कालावधीत ही संख्या ६,९६९ होती.

राज्यातील कोणत्याही शहराच्या तुलनेत वैयक्तिक वापरातील वाहनांची संख्या पुण्यात सर्वाधिक आहे. प्रामुख्याने दिवाळी आणि दसऱ्याच्या कालावधीत वाहनांची खरेदी मोठय़ा प्रमाणावर होत असते. यंदा करोनाच्या कालावधीत आर्थिक चणचण असल्याने नव्या वाहनांच्या खरेदीबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, प्रत्यक्षात प्रादेशिक परिवहन कार्यालयात नव्या वाहनांची नोंद पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहन खरेदीत फार मोठी घट झाली नाही.

नव्या वाहनांच्या नोंदणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज दसऱ्याच्या दिवशी सुरू ठेवण्यात आले होते. १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत पुणे शहरात ३७९४ नव्या दुचाकी, तर २३३८ नव्या मोटारींची नोंद झाली. गतवर्षी या कालावधीत ही संख्या अनुक्रमे ४९६९ आणि २००० इतकी होती. शहरांतर्गत प्रवासाची गरज म्हणून गेल्या काही वर्षांपासून शहरात खासगी वाहनांची संख्या वाढते आहे. करोनाच्या कालावधीतही वाहन खरेदी सुरूच असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते आहे. आरटीओच्या तिजोरीत त्यामुळे ३० कोटी ६३ लाखांहून अधिकचा महसूल जमा झाला आहे.

पिंपरीतून २४ कोटींचा महसूल

टाळेबंदीच्या काळात वाहन बाजारामध्ये आलेली मरगळ दसऱ्याच्या निमित्ताने झटकली गेली. दसऱ्याच्या कालावधीत िपपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ३ हजार ६३० वाहनांची नोंद झाली आहे. या वाहन नोंदणीतून आरटीओ कार्यालयामध्ये २४ कोटी १३ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. टाळेबंदीपासून पिंपरी, चिंचवड परिसरातील सर्व उद्योग बंद होते. मंदीचे मळभ असल्याने त्याचा परिणाम आरटीओ कार्यालयाच्या महसुलावर झाला होता. मात्र, दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठय़ा प्रमाणावर वाहन खरेदी झाल्याने आरटीओच्या तिजोरीत मोठी भर पडली.