विद्यार्थांच्या सुरक्षिततेवर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगत नवनियुक्त कुलगुरु नितीन करमाळकर  यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला. याशिवाय त्यांनी विद्यार्थांना नुसती डिग्री न देता उपजीवेकसाठी काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
क्रांती ज्योती सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी बुधवारी डॉ. करमाळकर यांची नियुक्ती झाली. नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, विद्यापीठातून दरवर्षी लाखो विद्यार्थी डिग्री घेऊन  बाहेर पडतात. मात्र, त्यांच्याकडे फक्त डिग्री हातामध्ये न राहता त्यांना उपजीविकेचे साधन मिळवून देण्यासाठी काम करणार आहे. त्याचबरोबर येत्या काळात साडे सहा लाख माजी विद्यार्थीच्या माध्यमातून विद्यापीठाची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.वासुदेव गाडे यांची १५ मेला कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर डॉ. नितीन करमाळकर यांची विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड करण्यात आली. करमाळकर मागील २५ वर्षांपासून अध्यापनाचे काम करत आहेत. भूगर्भशास्त्र आणि भूरसायनशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून पुणे विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. विद्यापीठाच्या अनेक समितींवर त्यांनी काम पाहिले आहे. गुरुवारी ते पदभार स्वीकारणार आहेत.