News Flash

हर्षोल्हासात नव्या वर्षांचे स्वागत

विविध उपक्रमांनी सरत्या वर्षांला निरोप

वर्षभरातील कडू-गोड आठवणींना साक्षी ठेवत मंगळवारी मावळत्या दिनकराने २०१९ या वर्षांला निरोप दिला.       (छायाचित्र : आशिष काळे)

विविध उपक्रमांनी सरत्या वर्षांला निरोप

पुणे : थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे परिधान करीत दुचाकीवरून फेरफटका मारणारे युवक-युवती, वेगवेगळ्या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी गर्दीने तुडुंब भरलेली शहरातील विविध हॉटेल्स आणि मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यासाठी तैनात करण्यात आलेले पोलीस कर्मचारी अशा हषरेल्हासात मंगळवारची रात्र जागवीत नव्या वर्षांचे मोठय़ा जल्लोषात स्वागत करण्यात आले. विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या आयोजनाने सरत्या वर्षांला निरोप देण्यात आला.

तिन्हीसांज झाल्यानंतर जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्ता, लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्ता, कोरेगाव पार्क या भागातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी रात्री आठनंतर शहरातील हॉटेल्समध्ये गर्दी झाली होती. त्यामुळे अनेकांना भोजन घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. २०१९ या वर्षांची आठवण म्हणून अखेरच्या दिवशी नव्या कपडय़ांची खरेदी करण्यात आली.

‘दारू नको दूध प्या’

नववर्षांचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे, या उद्देशातून विविध सामाजिक संस्था आणि महाविद्यालयांतील तरुणाईने मानवी साखळीतून ‘यूथ अगेन्स्ट अ‍ॅडिक्शन’चा संदेश दिला. ‘दारू नको, दूध प्या’ असे म्हणत केलेले प्रबोधन आणि रस्त्यावर उतरून लक्षणीय सहभाग घेत फलकांद्वारे जनजागृती करत सरत्या वर्षांला निरोप दिला. आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, कात्रज डेअरी आणि पुणे शहर पोलीस वाहतूक विभागातर्फे नामदार गोखले चौकात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. खासदार गिरीश बापट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महेश करपे, केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे यांच्यासह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

रस्ता सुरक्षा जागृती

भारती विद्यापीठ ‘इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’तर्फे (आय.एम.ई.डी.) रस्ता सुरक्षा जनजागृती अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत शहराच्या विविध भागातील चौकात सिग्नलच्या ठिकाणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नवीन वर्षांच्या शुभेच्छा आणि वाहतूक सुरक्षा विषयी संदेश असलेल्या ११ हजार शुभेच्छापत्रांचे आणि चॉकलेट वाटप केले. टिळक चौकातील भारती विद्यापीठ भवन येथे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ झाला.

संस्थेचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर, डॉ. अजित मोरे, डॉ. विजय फाळके, डॉ. सीमा तारणेकर या वेळी उपस्थित होत्या. कोथरूड डेपो, परिहार चौक,  स्वारगेट, कात्रज, शिवाजीनगर, कर्वे पुतळा, कात्रज सिग्नल, नामदार गोखले चौक, राजाराम पूल, अभिरुची मॉल,  नळ स्टॉप या चौकांत हे अभियान राबविण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 7:51 am

Web Title: new year celebration in pune zws 70
Next Stories
1 नोकरीच्या सर्वाधिक संधी महाराष्ट्रात
2 नव्या वर्षांत.. : प्रकल्प पूर्तीच्या वार्तेने आनंदकल्लोळ..
3 रुग्णालयातील महिला कर्मचारी दीड तास लिफ्टमध्ये अडकल्या
Just Now!
X