News Flash

नवजात बालकांमध्ये क्षयरोग संसर्गात वाढ

राज्याच्या आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भक्ती बिसुरे

शहरी भागांतही लागण; पालकांना काळजी घेण्याचे आवाहन

पोलिओपाठोपाठ क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य यंत्रणांकडून प्रयत्न होत असले तरी बालकांमधील वाढता क्षयरोग संसर्ग चिंतेचा विषय बनला आहे. मार्च २०१८ ते जानेवारी २०१९ या काळात राज्यातील सहाशे एकोणसाठ बालकांना क्षयरोगाची लागण झाली. विशेष म्हणजे या बालकांचा वयोगट नवजात शिशू ते एक वर्ष असा असून मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरी भागांमध्येही क्षयरोगाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. २०१७ मध्ये राज्यात एक लाख अठय़ाहत्तर हजार दोनशे पंचावन्न जणांना क्षयरोगाची लागण झाली होती. सन २०१८ मध्ये क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या दोन लाख अकरा हजार एवढी होती. त्यापैकी मार्च २०१८ ते जानेवारी २०१९ मध्ये सहाशे एकोणसाठ बालकांना क्षयरोग संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.

बालकांमध्ये जन्मत: क्षयरोग होण्याची अनेक कारणे असतात. गर्भवती महिलेला क्षयरोग झाला असल्यास तिच्या बाळाला त्याची लागण होण्याची शक्यता असते. कुटुंबात किंवा जवळपास क्षयाचे रुग्ण असतील तरी लहान मुलांना त्याचा संसर्ग लगेच होण्याचा धोका असतो, असे राज्य आरोग्य विभागाच्या क्षयरोग सहसंचालक डॉ. पद्मजा जोगेवार यांनी सांगितले.

ससून सवरेपचार रुग्णालयाच्या क्षयरोग विभागाचे प्रमुख डॉ. संजय गायकवाड म्हणाले, बाळाच्या सहवासात येणाऱ्या व्यक्ती उदा. आंघोळ घालणाऱ्या मावशी, सांभाळणारे मदतनीस यांना क्षयरोगाची लक्षणे नाहीत ना, याची खात्री करावी.

दीर्घ काळ सातत्याने येणारा ताप, खोकला ही लक्षणे असल्यास बाळाची क्षयरोगाची तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे. क्षयरोगाची लागण झाल्यास बाळाचे वजन वाढत नाही. भूक कमी झाल्याने त्याचा आहार मंदावतो. बाळ चिडचिड करते किंवा सतत थकल्यासारखे राहाते. क्षयाचे निदान होण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरकडून बाळाची तपासणी करून घ्यावी तसेच जन्मत:च बाळाला बीसीजी लस द्यावी.

काय काळजी घ्यावी?

* बाळाला जन्मत:च बीसीजी लस द्यावी.

* क्षयाचे निदान झाल्यास तातडीने औषधोपचार सुरू करावेत.

* घरातील, जवळपासच्या भागात क्षयाचे रुग्ण असल्यास बाळाला त्यांच्यापासून लांब ठेवावे.

* डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय औषधोपचार थांबवू नये.

एक वर्ष वयापर्यंत बालकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळेदेखील त्यांना क्षयाची लागण होते. तीन वर्षे वयापर्यंत बाळाचे क्षयाच्या संसर्गापासून रक्षण करणे आवश्यक आहे. क्षयाचा संसर्ग आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करावेत, मात्र क्षयाची औषधे दीर्घकाळपर्यंत घेणे गरजेचे असते.

– डॉ. पद्मजा जोगेवार, क्षयरोग सहसंचालक, राज्य आरोग्य विभाग.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 1:55 am

Web Title: newborn infants develop tb infection abn 97
Next Stories
1 डॉ. प्रियंका जावळे यांचा शोधप्रबंध सर्वोत्कृष्ट
2 शहरबात पिंपरी : स्वच्छ, सुंदर शहराची कचराकुंडी
3 शहराला सहा महिने पुरेल एवढा धरणांत पाणीसाठा
Just Now!
X